राज्यात अठरा महिन्यांत सोळा लाख शस्त्रक्रिया

किरण चव्हाण
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

माढा - महाराष्ट्र राज्य अठरा महिन्यांत मोतीबिंदूमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील 344 केंद्रांत 350 नेत्ररोगतज्ज्ञ दररोज दहा मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार असून, 18 महिन्यांत सुमारे सोळा लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानाचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

राज्यातील बहुतेक ठिकाणी डॉ. तात्याराव लहाने यांनी भेटी देऊन शस्त्रक्रिया कक्ष व संबंधित कर्मचारी यांची माहिती घेऊन आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. यापूर्वीच अभियान राबविण्याची पूर्वतयारी म्हणून केलेल्या पथदर्शी प्रकल्पात एक लाख शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित सुमारे 16 लाख शस्त्रक्रिया नियोजनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. याशिवाय राज्यभरातील विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थाही शिबिरे आयोजित करतात. त्याचाही हातभार लागणार आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील विविध तालुक्‍यांत महाआरोग्य शिबिरे घेऊन आलेल्या रुग्णांच्या संख्येवरून राज्यभरातील मोतीबिंदू रुग्णांची संख्या सुमारे 17 लाख आहे.

रुग्णांचे वर्गीकरण
-दोन्ही डोळ्यांनी अंध
-एका डोळ्याला मोतीबिंदू असलेले
-दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू असलेले
-पिकलेला मोतीबिंदू असलेले

अशी आहे व्यवस्था
344 - उपलब्ध शस्त्रक्रिया कक्ष
108 - अशासकीय संघटना
350 - नेत्ररोगतज्ज्ञांची संख्या

अभियानाचे नियंत्रण
डॉ. लहाने यांनी जिल्हानिहाय नेत्ररोगतज्ज्ञांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले असून, दररोज शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांची छायाचित्रे ग्रुपवर टाकायची आहेत. त्यामुळे राज्यात दररोज होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या मिळणार असून, यावरून अभियानाची गती लक्षात येणार आहे. आवश्‍यक तेथे काम वाढविण्याबाबत उपाययोजना करता येणार आहेत.

Web Title: madha news maharashtra news surgery state