दशमीला स्नानासाठी तीन लाख भाविक

राजकुमार घाडगे
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. आज माघी दशमीच्या दिवशी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज 13 तास लागत होते.

पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. आज माघी दशमीच्या दिवशी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज 13 तास लागत होते.

माघी एकादशीचा सोहळा उद्या (ता. 16) होणार असल्याने आज दिवसभर एसटी, रेल्वे, तसेच खासगी वाहनांतून वारकरी येथे येत असल्याचे दिसत होते. यात्रेनिमित्त नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागेमध्ये प्रशासनाने निवासासाठी उत्तम व्यवस्था केली असल्याने वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या परिसरात राज्यभरातून आलेले लाखो भाविक तंबू आणि राहुट्यांमधून मुक्कामास आहेत. 65 एकरांमध्ये प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी सुमारे तीन हजार झाडे लावली आहेत. ही झाडे आता मोठी झाल्याने भाविकांना उन्हापासून बचावासाठी झाडांच्या सावलीचा सुखद गारवा अनुभवास मिळत आहे.

चंद्रभागा नदीत यंदा स्नानासाठी मुबलक पाणी असल्याने भाविकांनी आज दशमीदिवशी स्नानाची पर्वणी साधली. भाविकांनी स्नानासाठी पहाटेपासूनच नदीच्या दोन्ही तीरांवर गर्दी केली होती. दुर्घटना होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपकावरून प्रशासनाकडून सूचना दिल्या जात होत्या.

श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज चार क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये याकरिता आज मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले दिसून आले. त्यांना येथील रेस्क्‍यू टीमचे सुमारे 100 स्वयंसेवक मदत करीत आहेत.

परगावच्या विक्रेत्यांचे स्टॉल
नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी महाद्वार व प्रदक्षिणा मार्ग परिसरातील अतिक्रमणे हटविली. मात्र, महाद्वार घाट, काळा मारुती, उत्पात गल्ली, नगरपालिकेसमोरील रस्ता या ठिकाणी परगावच्या विक्रेत्यांनी मधोमध आपले स्टॉल लावले आहेत, त्यामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांनादेखील तेथून चालणे मुश्‍कील होत होते.

गुरुवारी रात्री साडेसात वाजता तीन नंबरच्या पत्राशेडमधील दर्शन रांगेत उभा राहिलो होतो. 13 तासांनंतर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता दर्शन झाले. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेची चांगली व्यवस्था केली आहे.
- दत्ताराम काशीराम शिंदे, रा. चाकाडे, ता. खेड, जि. रत्नागिरी

चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्यानंतर महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी मंदिर समितीने चेंजिंग रूम उभारल्या आहेत, त्यामुळे महिलांची चांगली सोय झाली आहे. मात्र, यात्रेतील महिला भाविकांची संख्या पाहता समितीने चेंजिंग रूमची संख्या वाढवावी.
- श्रद्धा पाटील, मुंबई

Web Title: Magh Dashami Pandharpur Bhavik Chandrabhaga River Bath