चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांची दाटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पंढरपूर - माघी एकादशीच्या निमित्ताने आज सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणीमातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध मठ, मंदिरे आणि धर्मशाळांमधून सुरू असलेल्या नामघोषांनी पंढरीनगरी दुमदुमून गेली होती. चंद्रभागास्नानाची पर्वणी साधण्यासाठी आज सकाळपासूनच भाविकांची नदीकाठी एकच झुंबड उडाली होती. 

मुख्य चार यात्रांपैकी एक असलेल्या माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी मराठवाडा, कोकणासह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने पंढरीत आले आहेत. नदी पैलतीरावरील 65 एकर जागेसह शहरातील मठ व मंदिरे भाविकांनी तुडुंब भरले आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांनी उभारलेल्या राहुट्यांमधून विठूनामाचा जागर सुरू असून भाविकांच्या गर्दीने चंद्रभागेचे वाळवंट फुलून गेले आहे. 

आज सकाळी विविध फडकऱ्यांच्या दिंड्यांनी नगरप्रदक्षिणा पूर्ण करून एकादशीचा सोहळा साजरा केला. दोन दिवसांपासून श्री विठ्ठल दर्शनाची रांग दर्शनमंडप भरून पुढे गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे. दशमीच्या दिवशी पदस्पर्शदर्शनाची रांग पत्राशेडमध्ये होती. त्या वेळी भाविकांना दर्शनासाठी 12 तासांचा अवधी लागत होता. आज पहाटे दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यापर्यंत गेली होती. त्यामुळे दर्शनासाठी 14 तास लागले. 

दरम्यान आज पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. 

बाजारात दोन हजार जनावरे दाखल 
माघी यात्रेतील जनावरांच्या बाजारात या वर्षी मोठ्या संख्येने खिलार बैल, गायी, खोंड व पंढरपुरी म्हैस विक्रीसाठी दाखल झाली आहेत. वाखरी येथील पालखी तळावर भरलेल्या जनावरांच्या बाजारासाठी एकादशीच्या दिवशी दोन हजार जनावारे दाखल झाली आहेत. आजपासून पुढील तीन दिवस बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार होतात.

Web Title: maghi ekadashi pandhrpur

टॅग्स