विधानसभेत सत्ताधारी आमदारांसह विरोधकांचा गोंधळ

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 10 मार्च 2017

आजच्या कामाकाजादरम्यान विरोधकांसह सेना आमदारांनी कर्जमाफीची घोषणा लावून धरली.  त्यावेळी विरोधकासह सेना भाजप आमदारही वेलमध्ये उतरले होते. 

मुंबई : विधानसभेत आज पाचव्या दिवसाच्या कामकाजाला गोंधळाने सुरवात झाली. सत्ताधारी भाजप सेनेच्या आमदारांसह विरोधकांकडून कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यात आली. 
यावेळी सर्व पक्षीय आमदार प्रचंड आक्रमकपणे कर्जमाफीची मागणी करीत होते. प्रचंड गदारोळात प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला. मात्र कर्जमाफीच्या मागणीसाठी सर्व पक्षीय आमदार वेलमध्ये उतरल्याने दोनदा आर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. 

त्यानंतर कामकाजाला सुरवात होताच कामकाज सल्लागार समितीच्या शिफारसी आणि राज्यपालांच्या अभिभाषणाचा धन्यावाद प्रस्ताव गोंधळातच मंजूर करण्यात आला. गोंधळ वाढत असल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

विधानसभेचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधक व सेनेच्या आमदारांनी परिसर कर्जमाफीच्या घोषणांनी दणाणून सोडला. 'कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाय', 'असल्या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय,' मोदी सरकार हाय हाय, भगवे सरकार हाय हाय, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. 
आजच्या कामाकाजादरम्यान विरोधकांसह सेना आमदारांनी कर्जमाफीची घोषणा लावून धरली.  त्यावेळी विरोधकासह सेना भाजप आमदारही वेलमध्ये उतरले होते. 
काही आमदारांनी अध्यक्षांच्या समोर डायसवर चढण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीच्या मागण्या करणारा फलकच सचिवांच्या आसनासमोर लावला होता. कामाकाजात वाढता गोंधळ अन् घोषणाबाजीमुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज अर्धा तास स्थगित केले.
 

Web Title: Maha assembly adjourned: ruckus over farmer loan waiver