मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार: मुख्यमंत्री फडणवीस

पीटीआय
गुरुवार, 15 जून 2017

कुणी जर आम्हाला मध्यावधी निवडणुका लादायला भाग पाडत असेल, तर भाजपही त्यासाठी तयार आहे. मध्यावधी निवडणुकांची सगळी तयारी महाराष्ट्रातील भाजपने केली आहे आणि मध्यावधीनंतरही पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल.

मुंबई - राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले असून, महाराष्ट्रातील भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पीटीआयशी बोलताना मध्यावधी निवडणुकीबाबत प्रथमच वक्तव्य केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यावधी निवडणुका होण्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे आहे. राज्यभरात शेतकरी आंदोलन पेटल्यानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफी दिली नाही, तर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने केली होती. तसेच, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल, असा दावा केला आहे. त्यामुळे मध्यावधीची शक्यता जास्त निर्माण झाली होती. 

कुणी जर आम्हाला मध्यावधी निवडणुका लादायला भाग पाडत असेल, तर भाजपही त्यासाठी तयार आहे. मध्यावधी निवडणुकांची सगळी तयारी महाराष्ट्रातील भाजपने केली आहे आणि मध्यावधीनंतरही पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपला सगळीकडे चांगलं यश मिळाले आहे, याचाच अर्थ राज्यातल्या जनतेचा भाजपवर अधिक विश्वास आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Web Title: Maha BJP prepared for mid-term polls: Fadnavis