जानकरांचा भाजपऐवजी रासपकडून अर्ज दाखल

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 5 जुलै 2018

भाजप त्यांचेच पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आग्रही असल्यामुळे जानकर यांच्या उमेदवारी अर्जाबाबत विधानसभा परिसरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजपने बुधवारी जानकर यांच्यासह पाचजणांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अकरा जागांसाठी बिनविरोध निवडणूक होईल, असा अंदाज होता.

नागपूर : राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) या त्यांच्या पक्षातर्फे विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला, तर भाजपनेही ऐनवेळी पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले.

भाजप त्यांचेच पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आग्रही असल्यामुळे जानकर यांच्या उमेदवारी अर्जाबाबत विधानसभा परिसरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजपने बुधवारी जानकर यांच्यासह पाचजणांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अकरा जागांसाठी बिनविरोध निवडणूक होईल, असा अंदाज होता. मात्र, जानकर यांनी भाजपकडून अर्ज भरण्याऐवजी रासपकडून अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, जानकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 
भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहीतीनुसार, भाजपच्याच पाच उमेदवारांना निवडून द्यावे, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपने देशमुख यांनाही अर्ज भरण्यास सांगितले आहे. विधान परिषदेसाठी माघारीची मुदत सात जुलैपर्यंत आहे. 

Web Title: Mahadev Jankar file nomination from Rashtriya Samaj Paksha