Politics: महायुतीत फूट! रासपचा स्वबळाचा नारा, महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp, shivsena

Politics: महायुतीत फूट! रासपचा स्वबळाचा नारा, महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपा बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये शिंदे गटाला फक्त ५० जागा देणार असल्याचं ते बोलत आहेत आणि नंतर लगेच सारवासारव करताना दिसत आहेत.

काही वेळानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला होता. मात्र या व्हिडीओ वरून शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, भाजपने जागा वाटप जाहीर केल्याचं समजतं, यामध्ये आमचा विचार केला नाही. महाविकास आघाडी विरूध्द शिंदे आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढणार असल्याचं दिसत आहे. त्यांना आम्हाला सोबत घेण्याची इच्छा दिसत नाही. त्यांना आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर हरकत नाही. आम्ही स्वबळावर लढू, असं महादेव जानकर म्हणाले.

तर पुढं म्हणाले, आपल्या चौकात, आपली औकात वाढवली पाहिजे. आता आम्ही दोन आमदार आहोत. मी वरच्या सभागृहात आहे. दुसरा खालच्या सभागृहात आहे. 98 जिल्हा परिषदा आमच्याकडे आहेत. तर तिन सभापती देखील आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक-एक जिल्हा परिषद सदस्य आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला टेक्निकली मान्यता मिळाली आहे.

जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहे. भाजपची इच्छा नसेलच आम्हाला घ्यायची. आम्ही आमच्या ताकदीवर ४८ लोकसभा लढू, भाजपला जर आम्हाल सोबत घ्यायचं नसेल तर आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत.

आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्हाल पाच लोकसभेच्या जागा आम्हाला मिळाव्यात, आम्ही ज्या ठिकाणी आमची ताकत आहे त्या ठिकाणाच आम्ही या जागा मागत आहे, जर त्याना हा प्रस्ताव मान्य नसेल तर आम्ही वेगळं लढू अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मांडली.

टॅग्स :Shiv SenaBjp