रासपच्या उमेदवारीवरच जानकर विधान परिषदेत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत असताना भाजपच्या दबावाला बळी न पडता महादेव जानकर यांनी स्वपक्षाची उमेदवारी कायम राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांना आज पक्षाच्या आदेशाने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. या अकरा आमदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक चार व एक सहयोगी पक्षाचा सदस्य, तर कॉंग्रेस, शिवसेना प्रत्येकी दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक आणि शेतकरी कामगार पक्ष एक, असे अकरा आमदार बिनविरोध विजयी झाले आहेत.
सुरवातीला भाजपच्या पाच उमेदवारांच्या यादीत जानकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, जानकर यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी विद्यमान भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. जानकरांच्या या पवित्र्यामुळे भाजपने पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज दाखल करून जानकर यांच्यासमोर माघार किंवा पराभव असा पर्याय ठेवला होता. पण, जानकर यांनी अखेरपर्यंत भाजपच्या दबावाला बळी न पडता स्वपक्षाची उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली.

हे बिनविरोध
भाजप - भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील, निलय नाईक
शिवसेना - मनीषा कायंदे, अनिल परब
कॉंग्रेस - शरद रणपिसे, वजाहद मिर्झा
राष्ट्रवादी कॉंग्रेस - बाबाजानी दुर्राणी
रासप - महादेव जानकर
शेकाप - जयंत पाटील.

Web Title: Mahadev Jankar Vidhan Parishad Politics