कोरोनाच्या काळात तरुणांना संधी, गृहमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

पूजा विचारे
Sunday, 19 July 2020

राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदे लवकरच भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्यात.

मुंबईः कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारनं तरुणांना नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदे लवकरच भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्यात. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

गृहमंत्र्यांनी या संदर्भात शुक्रवारी गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचाः प्रतिबंधित क्षेत्र, नवीन मार्ग सर्व माहिती एका क्लिकवर; उबरच्या एॅपमध्ये आता मिळणार कोविडची माहिती

राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता.

गेल्या वर्षीच्या पोलिस भरतीसाठी ज्यांनी महा आय.टी. पोर्टलमार्फत अर्ज केलेले आहेत, त्यांच्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.  पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

अधिक वाचाः  महिनाभरात सव्वा लाखांपेक्षा जास्त मद्यसेवन परवाने मंजूर, होम डिलीव्हरी सेवेचा ३५ लाख मद्यप्रेमींनी घेतला फायदा
 

पोलिस शिपाई गट-क संवर्गातील रिक्त असलेली ५ हजार २९७ पदे आणि चालू वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनाम्यामुळे रिक्त होणारी पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई या संवर्गातील एकूण ६ हजार ७२६ पदे तसेच  मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलिस शिपाई संवर्गातील ५०५ हून अधिक अशी एकूण १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत,अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

maharashtra 12 thousand police recruitment home minister anil deshmukh announced


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra 12 thousand police recruitment home minister anil deshmukh announced