
Narhari Zirwal:“…तर एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार”, नरहरी झिरवळांनी दिला दाखला!
गेल्या अकरा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर आज फैसला होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकार तरणार की जाणार? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीच घटनापीठाकडून उद्या दोन महत्त्वाचे निकाल लागण्याचे संकेत दिले आहेत. आज सकाळी साडेअकरानंतर निकाल लागण्याची शक्यता असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची धाकधूक वाढली आहे. या संपूर्ण प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी सत्तासंघर्षावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील सत्ता संघर्षातील सर्व प्रक्रियेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. झिरवाळ म्हणाले की, मी दिलेला निकाल हा कुठल्या आकसापोटी दिलेला नसून घटनेनुसार दिला आहे. त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा विचार करून निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नरहरी झिरवळ यांनी १० महिन्यांपूर्वी शिंदे गटाच्या १६ आमदारांना पक्षविरोधी कारवायांच्यामुळे अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. आता झिरवळ यांनी आपण घेतलेला निर्णय कायद्याला धरूनच होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
झिरवळ म्हणाले की, “मी हा निर्णय घटनेला धरूनच केला आहे. आजचा निर्णयही अपात्रतेचा येईल. जर १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अपात्र झाल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाईल. त्यानंतर सरकार कोसळेल, तर घटना कुणाच्या दबावाखाली बदलत नाही. त्यामुळे आज त्यांचे आमदार अपात्र होतील. अध्यक्षही निर्णय घेताना घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास करूनच घेतील. मी तेव्हा घेतलेला निर्णय चुकीचा म्हटलं तर आपण कायद्यावर संशय घेतोय असा त्याचा अर्थ होईल”, असंही झिरवळांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
पुढे झिरवळ म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालय कायदा तपासूनच सर्व अँगलने विचार करून निकाल देणार आहे. हा निर्णय फक्त राज्यापुरता मर्यादित नाही तर देशाला तो लागू होईल”, असंही झिरवळ पुढे म्हणाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. एम.आर.शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि पी.नरसिम्हा यांच्या घटनापीठापुढे सत्तासंघर्षावर दोन महिन्यांपूर्वीच दीर्घ सुनावणी पूर्ण झाली.
त्यानंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला होता. घटनापीठातील सदस्य न्या.एम.आर.शहा हे येत्या १५ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्याआधीच निकाल येईल असे संकेत मिळत होते. सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल झाल्या आहेत त्यात सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाने दिलेल्या आव्हानाचाही समावेश आहे.
‘त्या’ सोळा आमदारांचे काय?
राज्यातील सोळा आमदारांशी संबंधित अपात्रतेच्या मुद्द्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या आमदारांच्या यादीत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे यांचा समावेश आहे.