
आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांनी शेतकर्यांच्या मुद्दावर तत्कालीन काँग्रेस पक्ष गंभीर नसल्याचे कारण समोर करून २००८ मध्ये त्यांनी नेतृत्वावर टीका करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
भंडारा : आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहे. साकोली तालुक्यातील सुकळी येथे फाल्गूणराव पटोले यांच्या शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा जन्म ५ जून १९६३ मध्ये झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते नानाभाऊ म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. विद्यार्थी संघटनेत काम करीत असताना १९९० मध्ये सानगडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढविली. यात ते विजयी झाले. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
प्रफुल्ल पटेलांचा केला पराभव
१९९९ व २००४ मध्ये काँग्रेसने लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. यात त्यांनी विजयी मिळविला. मात्र, आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांनी शेतकर्यांच्या मुद्दावर तत्कालीन काँग्रेस पक्ष गंभीर नसल्याचे कारण समोर करून २००८ मध्ये त्यांनी नेतृत्वावर टीका करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दरम्यानच्या काळात ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून २००९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा लढविली. त्यात त्याचा पराभव झाला. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपकडून विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी सुमारे दीड लाख मताधिक्याने पराभव केला होता.
आणखी वाचा - भाजपला हरवण्याचं उद्धव ठाकरेंचं महासत्तानाट्य
आणखी वाचा - भाजपच्या सापळ्यातून सुटका, शिवसैनिकांना बळ
काँग्रेसमध्ये घरवापसी
८ डिसेंबर २०१७ ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र ङ्कडणवीस आणि भाजपच्या ध्येयधोरणांवर नाराजी व्यक्त करून जाहीर टीका करीत शेतकरी व इतर मागासवर्गाच्या प्रश्नांवर लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्ष मधून राजीनामा दिला. काँग्रसमध्ये घरवापसी केल्यानंतर त्यांना अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढविली. यात त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत साकोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा पराभव करून त्यांनी विजय खेचून आणला. एक वेळा खासदार राहिलेले नाना पटोले हे यावेळी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.ओबीसी बांधव व शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच त्यांनी आक्रमक भूमिका घेतात. शेतकर्यांच्या प्रश्नावर ते नेहमीच आंदोलन केली आहे. यामुळे आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे.