Maharashtra Budget 2019 : अर्थसंकल्प फुटल्यावरून गदारोळ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करून अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करून अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या वेळी सभागृह तहकूब केल्याने विधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अविश्‍वास ठराव मांडणार असल्याचे जाहीर केले.

विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडत असताना मुनगंटीवार यांच्या ट्‌विटरवरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हरकत घेतली. अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होण्याआधीच फुटला असून, हा दोन्ही सभागृहांचा आणि सदस्यांचा अपमान आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. 

अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून अर्थसंकल्पातील गोष्टी ट्‌विट केल्या जात होत्या. या गोष्टी जाहिरातीसहित ट्‌विटवर प्रसिद्ध केल्या जात होत्या. याचा अर्थ याअगोदरच अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडिया हॅंडल करणाऱ्या टीमच्या हाती लागला होता, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर संतप्त चंद्रकांत पाटील यांनी सभापती हे विरोधकांना झुकते माप देत असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडण्यात येणार असल्याचे सांगितले.
सध्या विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत असल्याने सभापतींच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडल्यास रामराजे नाईक निंबाळकर यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्‍यता आहे.

ठळक वैशिष्ट्ये
कृषी

 २०१९ च्या मॉन्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता. 
 जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सहा लाख दोन हजार मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण. त्या माध्यमातून २६.९० टीएमसी पाणीसाठा क्षमता निर्माण, या योजनेवर ८,९४६ कोटी रुपये खर्च.
    मृद व जलसंधारणाकरिता ३ हजार १८२ कोटी २८ लाख ७४ हजार रुपये
    मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात २५ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट. याकरिता १२५ कोटी रुपये प्रस्तावित.
    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी २१० कोटी रुपये
    कृषी विद्यापीठे व नवीन कृषी महाविद्यालये यासाठी २०० कोटी रुपये, मूल (जि. चंद्रपूर), हळगाव (जि. नगर) येथे शासकीय कृषी महाविद्यालये, तर यवतमाळ आणि पेठ (जि. सांगली) येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये स्थापणार.
    मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता.
    सामूहिक गटशेतीसाठी चालू आर्थिक वर्षात १०० कोटी रुपये राखीव.
    २,२२० कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविणार.
    कोकणातील काजूप्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करणार.
    मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत ८० तालुक्‍यांत फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापणार.
    गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी ३४ कोटी ७५ लाख रुपये इतकी तरतूद.
    नीलक्रांती अभियानांतर्गत पार्डी (जि. अमरावती) येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालयाची स्थापना, ससून गोदी बंदराचे आधुनिकीकरण, रायगड जिल्ह्यातील करंजा येथे मासेमारी बंदराची निर्मिती, वेंगुर्ले तालुक्‍यात वाघेश्वर येथे खेकडा, जिताडा व कालव मत्स्यबीज उत्पादन केंद्राची निर्मिती, ९० टक्के अनुदानावर शेतकरी गटांना मासळी विक्रिसाठी फिरते वाहन, या योजना राबविणार.
    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी २४ हजार १०२ कोटी रुपये मंजूर.

सिंचन
 गेल्या साडेचार वर्षांत तीन लाख ८७ हजार हेक्‍टर अतिरिक्त सिंचन क्षमता आणि एक हजार ९०५ दक्षलक्ष घनमीटर (६७ टीएमसी) पाणीसाठा निर्माण.
    राज्यातील २६ अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश, या प्रकल्पांची उर्वरित किंमत २२ हजार ३९८ कोटी असून, त्यापैकी ३,१३८ कोटी केंद्रीय अर्थसंकल्पातून प्राप्त होणार.
    प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी २०१९-२० या वर्षात २,७२० कोटी रुपये
    बळिराजा जलसंजीवनी योजनेकरिता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता १,५३१ कोटी रुपये एवढी भरीव तरतूद.
    २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागाकरिता १२ हजार ५९७ कोटी १३ लाख ८९ रुपये हजार तरतूद
    सूक्ष्म सिंचनासाठी ३५० कोटी रुपये राखीव.

तीर्थक्षेत्र विकास व अन्य
 श्रीक्षेत्र कपिलधारा (ता. जि. बीड), श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम), कुणकेश्वर (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) व आंगणेवाडी (ता. मालवण जि. सिंधुदुर्ग), सद्‌गुरू सखाराम महाराज अमळनेर (जि. जळगाव), निवृत्तीनाथ मठ (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) या तीर्थक्षेत्रांतील यात्रेकरूंच्या सोयीकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ५० कोटी रुपये इतका निधी राखीव.
    शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी गृह, नगरविकास, परिवहन विभाग, तसेच शिर्डी संस्थान यांच्या समन्वयातून पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय, तसेच सिंधुदुर्ग, औरंगाबाद व नागपूर या तीन जिल्ह्यांत आणि शिर्डी, मुंबई येथे पर्यटन पोलिस ही संकल्पना राबविण्याचा निर्णय.
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय.
    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात १५० कोटी रुपये निधी राखीव.

ग्रामीण
 ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक असलेल्या १२ बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठी खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत कुटिरोद्योग, लघुद्योग यांना प्रोत्साहन देणार. यासाठी १०० कोटी रुपये निधी राखीव.
    ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी २०० कोटी रुपये इतका निधी राखीव.
    प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर पाच लाख ७८ हजार १०९ घरांपैकी चार लाख २१ हजार ३२९ घरे बांधून पूर्ण. उर्वरित सहा लाख ६१ हजार ७९९ लाभार्थींना घरे मंजूर करण्याचे नियोजन.
    ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना शासनातर्फे घरकुल बांधून मिळणार. यासाठी १०० कोटी रुपये नियतव्यय राखीव.

शिक्षण व कला
 शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी येत्या पाच वर्षांत ५० हजार शिक्षकांना प्रशिक्षित करणार. यासाठी चालू आर्थिक वर्षात दहा कोटी रुपये राखीव.
    इयत्ता पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना लागू करणार
    इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यातून व विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्काराने गौरविणार. एक लाख व ५१ हजार रुपयांच्या रोख पुरस्कारांनी होणार गौरव.
    इतर मागास प्रवर्गातील मुलांसाठी १८ आणि मुलींसाठी १८ अशी एकूण ३६ वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता. यासाठी या वर्षी २०० कोटी रुपये इतका राखीव.
    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी १०० कोटी रुपये इतका नियतव्यय राखीव.
    क्रांतिकारक खाजाजी नाईक यांचे स्मारक धरणगाव (जि. जळगाव), ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), श्री. शिवरामराजे भोसले यांचे स्मारक सावंतवाडी येथे, वीर भागोजी नाईक यांचे स्मारक नांदुर शिंगोटे (जि. नाशिक) येथे, वीर नाग्या कातकरी यांचे स्मारक चिरनेर (जि. रायगड) येथे, वीर बाबूराव शेडमाके यांचे स्मारक घोट (जि. गडचिरोली) येथे, जंगल सत्याग्रहात वीर मरण आलेल्या शंभर जनजाती वीरांचे जनकापूर (जि. नाशिक) येथे, रावलापाणी स्वातंत्र्य संग्रामाचे स्मारक रावलापाणी (जि. नंदुरबार) येथे उभारण्याचा निर्णय. सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या पानशेत (जि. पुणे) येथील स्मारकाची दुरुस्ती करण्याचा निर्णय. यासाठी ५० कोटी रुपये राखीव. 
    मुंबईत भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय.
    रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याकरिता ६०६ कोटी रुपये एवढ्या योजनेच्या खर्चास मान्यता.
    महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आंबेगाव (बु.), (ता. हवेली, जि. पुणे) येथे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवसृष्टी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी या वर्षी ५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करणार.
    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी मुदत ठेवीमध्ये आणखी दहा कोटी रुपयांची तरतूद. आता या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपये उपलब्ध होणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Budget 2019 Leakage Confusion