Maharashtra Budget 2019 : विरोधकांचा सभात्याग; मुख्यमंत्र्यांचा प्रतिटोला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत विरोधकांत अचानक चलबिचल सुरू झाली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी मध्येच हरकत घेत अर्थमंत्री विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत असताना बाहेर सोशल मीडियात तो अगोदरच प्रसारित होत असल्याचा आक्षेप घेतला. हा अर्थसंकल्प फुटला असून, मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई - राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत विरोधकांत अचानक चलबिचल सुरू झाली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी मध्येच हरकत घेत अर्थमंत्री विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत असताना बाहेर सोशल मीडियात तो अगोदरच प्रसारित होत असल्याचा आक्षेप घेतला. हा अर्थसंकल्प फुटला असून, मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. सोबत हातात अर्थसंकल्पातील काही घोषणा ट्‌विटरवर आल्याचा हवाला देत त्यांनी अर्थसंकल्प रोखून धरण्याचा प्रयत्न केला. या अचानक गदारोळामुळे सर्वच विरोधी पक्षांचे आमदार व नेते उभे राहिले अन्‌ अर्थसंकल्पाचे वाचन रोखण्याचा प्रयत्न केला.

त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही हरकत फेटाळून लावत विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन केले. त्यातच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात ओबीसी समाजासाठी महत्त्वपूर्ण घोषणा सुरू असल्यानेच विरोधकांचा संताप सुरू झाल्याचा टोला लगावला. त्यामुळे विरोधक अधिकच संतप्त झाले. सरकारच्या या आक्रमक भूमिकेमुळे अर्थसंकल्पाच्या भाषणावर बहिष्कार घालत विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधकांशिवाय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत हा अर्थसंकल्प फुटला नसल्याचा निर्वाळा दिला.

सध्या समाज माध्यमे बदलत आहेत. सभागृहात अर्थमंत्री ज्या घोषणा करीत आहेत; त्या पंधरा मिनिटांच्या फरकाने सोशल मीडियामध्ये प्रसारित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी विरोधक सोशल मीडियाचा उत्तम वापर करतात; पण त्यांनी सकारात्मक बाबीसाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण घ्यायला हवे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Budget 2019 Opposition Party Chief Minister Politics