
Maharashtra Budget: फक्त 1 रुपयांत पीकविमा; महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडत आहे. त्यांनी आपला अर्थसंकल्प पंचामृतावर आधारित असल्याचं म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प मांडत आहेत यावेळी शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी २०१६च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरेल असं सांगितलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला फक्त १ रुपये भरून पोर्टलवर नोंदणी करावी लागेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासाठी वार्षिक ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्यांवर याचा कोणताच भार असणार नाही. हा हप्ता राज्य सरकार भरणार तर शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा देणार असून यासाठी 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
त्याचबरोबर बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आम्ही जाहीर करतो. केंद्र सरकारच्या सहा हजारच्या निधीत राज्य सरकार आणखी सहा हजार रुपयांची भर घालणार असून आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार आहे. याचा लाभ १ कोटी १५ शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२४-२४ वर्षासाठी ६ हजार ९०० कोटी रुपये निधी प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले आहेत.