
Ajit Pawar : १४ मार्चची कुणकुण लागल्यानेच घोषणांचा पाऊस...; अजितदादांचं वर्मावर बोट
मुंबई - राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला आला. या अर्थसंकल्पातून मोठमोठ्या घोषणांमुळे महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा मिळाला असं चित्र आहे. मात्र अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हवा काढली आहे. (Maharashtra Budget )
अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असणारा आहे.
अजित पवार म्हणाले, फडणवीस जेव्हा अर्थसंकल्प वाचत होते, तेव्हा मला १४ मार्च डोळ्यासमोर येतो. सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १४ मार्च रोजी लागणार आहे. हा निकाल विरोधात जाणार हे सत्ताधाऱ्यांना कळलं आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्पात जेवढ्या काही घोषणा करायच्या, त्या करून घ्या हेच घोषणांमागचे कारण असावं. शिवाय पदवीधर निवडणुकीत बसलेला धक्का आणि पोटनिवडणुकीतील पराभव यामुळे अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा झाल्या आहेत.
दरम्यान कोकणात झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर तिकडे सत्ताधाऱ्यांच्या सभांमध्ये रिकाम्या खुर्च्या दिसतात. यामुळे सत्ताधारी गडबडले असून होत, नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढं बघू असा हा अर्थसंकल्प होता, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
सरकार आलं तेव्हा ७५ हजार पदांची नोकर भरतीची घोषणा केली. मात्र अजुनही काहीही झालं नाही. त्यामुळे लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.