CM Eknath Shinde News: CM शिंदे पवारांवर भडकले; मध्यस्थी करत फडणवीस म्हणाले, 'जाऊ द्या...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde News

CM Eknath Shinde: CM शिंदे पवारांवर भडकले; मध्यस्थी करत फडणवीस म्हणाले, 'जाऊ द्या...'

CM Eknath Shinde News: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आजच्या अधिवेशनात अनेक मुद्दे मांडण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांना देशद्रोही म्हटल्याच्या आरोपाला फेटाळून लावत स्पष्टीकरणं दिलं. त्यावेळी मध्यस्थी होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊ द्या...म्हणत सुरु झालेली खडाजंगी थांबवण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Budget Session CM Eknath Shinde Ajit Pawar Nawab Malik maharashtra politics )

मुख्यमंत्री शिंदे यांनी चहापानावरुन विरोधकांवर टीका केली होती. देशद्रोह्यांबरोबर चहापान टळलं, अशी टीका त्यांनी केली होती. यावर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. अजित पवार यांना देशद्रोही म्हटले, असा आरोप विरोधकांनी केला.

त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यावर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरणं दिलं.

नेमकं काय घडलं सभागृहात?

होय मी देशद्रोही म्हटलं. मात्र मी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं. मी माझ्या शब्दांवर आजही कायम आहे. नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणणं गुन्हा असेल तर हा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेल, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.

देशद्रोही दाऊद इब्राहीमसह अनिस शेख, छोटा शकील, हसिना पारकर यांच्यावर द्रेशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र नवाब मलिक यांनी हसिना पारकरकडून जमीन घेतली. तसेच सरदार खानकडून नवाब मलिक यांनी एक गाळा देखील घेतला. २००५ साली सरदार खानला मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झाली.

नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक झाली. यानंतर ईडी, सीबीआयने एनआयए यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांना कोठडी झाली. उच्च न्यायालाय आणि सुप्रीम न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.

नवाब मलिकांवर दहशतवादी कलमे देखील लावण्यात आली आहे. त्यांना मी देशद्रोही म्हणालो, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं. देशद्रोही दाऊद इब्राहीमसोबत व्यवहार असणाऱ्या नवाब मलिकांना पाठीशी घालणाऱ्या आणि राजीनामा न मागणाऱ्या लोकांसोबत चहा पिणं टळलं असं मी म्हटंल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

तसेच अंबादास दानवे तुमचं नवाब मलिक यांना सर्मथन आहे का?, त्यांना द्रेशद्रोही म्हणायचं नाही का?, असा सवाल देखील शिंदेंनी विचारला.

त्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदा आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हटलं होतं. आम्ही महाराष्ट्रद्रोह काय केला?, असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थित केला.

तसेच २०१९ रोजी मतदारांनी दिलेल्या मतदानाविरुद्ध जाऊन तुम्ही दुसऱ्या पक्षासोबत सत्ता स्थापन केली. हा महाराष्ट्रद्रोह नाही का? तसेच अजित पवारांनी कितीतरी वेळी कायकाय म्हटलंय..आता सांगू इच्छित नाही...जाऊद्या, त्याच्यात मला पडायचं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले हो जाऊद्या...त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपलं भाषण थांबवलं.