अखेर मंत्रिमंडळ विस्ताराच ठरलं; आता रविवारचा मुहूर्त?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे.

मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे.

शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर पडत आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता. १७) सुरू होणार असून, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले होते. यासाठी १२, १४, १५ आणि १६ जूनचे मुहूर्त भाजप नेते देत होते. 

विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेते गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अनेक नेत्यांना विस्तारात संधी दिली जाईल, असे भाजप नेते दोन आठवड्यांपासून सांगत आहेत. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्री करायला शिवसेना नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. एकनाथ शिंदे सोडल्यास शिवसेनेचे अन्य कॅबिनेट मंत्री विधान परिषदेचे सदस्य असल्याने शिवसेनेत सुरवातीपासूनच धुसफूस आहे. 

फडणवीस उद्या (ता. १५) निती आयोगाच्या बैठकीसाठी नवी दिल्लीला जाणार आहेत. ते पक्षाध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी यांची भेटही घेणार आहेत. पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला तर रविवारी राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्‍यता आहे. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात. 

विस्ताराची तारीख सांगायला माझ्याकडे पंचांग आलेले नाही.
- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Cabinet expansion