अमित शहांच्या दौऱ्यानंतर विस्तार? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई - फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर मार्गी लागण्याची चर्चा सुरू आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांनी या मुहूर्ताकडे लक्ष ठेवणे सुरू केले आहे. भाजपमधील काही ज्येष्ठ नेते आशीष शेलार यांच्या समावेशासाठी आग्रही असल्याचे समजते. शिवसेनेशी या विस्ताराबाबत चर्चा करावी, असेही भाजपच्या काही नेत्यांना वाटत आहे. 

शिवसेनेची नाराजी तसेच त्यांना संधी मिळणार नाही, त्यांचा रोष या दोन कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. नारायण राणे यांना मंत्री केल्यास शिवसेना कोणती भूमिका घेईल, असा पेच भाजपसमोर होता. आता राणे यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे विस्ताराच्या हालचाली सुरू करा, असा काही नेत्यांचा आग्रह आहे. महाराष्ट्रातील सरकार एक खांबी तंबू आहे, फडणवीस एकटेच कारभार हाकत असल्याने त्यांच्या मदतीला काही महत्त्वाचे नेते दिले जावेत, असा एका गटाचा आग्रह आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर विस्ताराच्या हालचाली सुरू होतील, असे भाकीत केले जाते. आशीष शेलार, राजेंद्र पटणी, संजय कुटे यांच्या समावेशाची चर्चा आहे. आशीष शेलार यांना मंत्री केल्यास बरेच फायदे होतील, असे मानले जाते. निवडणुकीला केवळ एक वर्ष राहिले असताना ही संधी शेलार यांना दिली जाईल काय, याबद्दल उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेलारांबद्दल काय वाटते, ते त्यांना मंत्री करणार की पक्ष विस्ताराची जबाबदारी सोपवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

Web Title: maharashtra Cabinet expansion BJP amit shah