टीम 'देवेंद्र'चा आज विस्तार; आयारामांना 'कॅबिनेट'चे नजराणे

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 16 जून 2019

आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आजचा (ता. 16) मुहूर्त मिळाला.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आजचा (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते.

याशिवाय मुंबईतील ऍड. आशीष शेलार यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर यांच्यासह अंदाजे अकरा जण मंत्री आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव हे रविवारी सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ देतील. शिवसेना-भाजपचे मिळून एकूण 11 नवे मंत्री शपथ घेतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. विधानसभा निवडणुकीआधी होणारा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधत मंत्र्यांची नावे निश्‍चित केली आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून विदर्भातील डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, औरंगाबाद येथील अतुल सावे, सांगली जिल्ह्यातील शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे यांना मंत्री म्हणून संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, कोल्हापुरातील आमदार राजेश क्षीरसागर, विधान परिषद सदस्य तानाजी सावंत, रत्नागिरीचे उदय सामंत यांची नावे चर्चेत आहेत. 

निष्क्रिय मंत्र्यांवर गंडांतर 

जुन्या मंत्रिमंडळातील निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर तोशेरे ओढले आहेत. त्यामुळे महेता यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आशीष शेलार यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहेत.

महेतांनी राजीनामा दिला, तर मुंबईतील गुजराती भाषिक चेहरा म्हणून योगेश सागर यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. राज्यमंत्री विद्या ठाकूर, राजे अम्बरीशराव राजे अत्राम, प्रवीण पोटे-पाटील यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्‍यता आहे. 

संभाव्य मंत्री 

राधाकृष्ण विखे-पाटील 
जयदत्त क्षीरसागर 
आशीष शेलार 
अतुल सावे 
डॉ. संजय कुटे 
डॉ. अनिल बोंडे 
तानाजी सावंत 
उदय सामंत 
अविनाश महातेकर 
संजय ऊर्फ बाळा भेगडे 
योगेश सागर 
शिवाजीराव नाईक 

यांना डच्चू 

प्रकाश महेता 
विष्णू सवरा 
राजकुमार बडोले 
विद्या ठाकूर 
राजे अम्बरीशराव अत्राम 
प्रवीण पोटे-पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Cabinet Expansion New Party Member get Ministry