महाराष्ट्रात मुख्यमंत्री दीर्घकाळ राहत नाही - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - भूमिपूजन केल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे उद्‌घाटन करण्याची संधी मला तीन वर्षांत मिळाली आहे. हे माझे भाग्य समजतो. कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री दीर्घकाळ राहत नाही, असे धक्‍कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विक्रोळी येथे एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. फडणवीस यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तीन वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, महापालिका, ग्रामपंचायती यामध्ये भाजपला राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवून दिले. तसेच पक्षाअंतर्गत, मंत्रिमंडळातील मातब्बर सहकाऱ्यांशी समर्थपणे सामना केल्यानंतर फडणवीस यांच्या खुर्चीस कोणताही धोका नव्हता. त्यांचे स्थान अबाधित असताना फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय जाणकार तर्क लावत आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने खेळलेली चाल, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून दिले जाणारे प्रतिनिधी आदी निवडणुकीचे आव्हान पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्‍तव्य नक्‍कीच धक्‍कादायक मानले जाते.

Web Title: maharashtra chief minister devendra fadnavis politics