साधेपणा आवडणारे, बडेजाव टाळणारे मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आज (ता. 22) रोजी होणारा पन्नासाव्या वर्षातील प्रवेशाचा वाढदिवस नेहमीसारखाच असेल उलट अधिक कामाचा असेल. पाणीपुरवठा प्रश्‍न, पीक आढावा अशा महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांसंबंधी उदया बैठका होणार आहेत.महाराष्ट्रात ज्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरे गेले त्यानेच पुन्हा निवडणूक जिंकल्यावर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मान आजवर केवळ वसंतराव नाईकांना मिळाला आहे.

मुंबई : वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहिलेले भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन या विश्‍वासाने पुढील वाटचालीस सज्ज झाले आहेत. अगदी वाढदिवसाच्या दिवशीही कामांचा धडाका लावत. फडणवीस वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत, केकही कापत नाहीत. आई सरिताताई, पत्नी अमृता यांच्या दबावामुळे औक्षण तेवढे होते अन् कार्यकर्त्यांनी केक आणलाच तर तो कन्या दिवीजा कापते. बाकी दिवस नेहमीसारखाच असतो.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आज (ता. 22) रोजी होणारा पन्नासाव्या वर्षातील प्रवेशाचा वाढदिवस नेहमीसारखाच असेल उलट अधिक कामाचा असेल. पाणीपुरवठा प्रश्‍न, पीक आढावा अशा महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांसंबंधी उदया बैठका होणार आहेत.महाराष्ट्रात ज्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरे गेले त्यानेच पुन्हा निवडणूक जिंकल्यावर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मान आजवर केवळ वसंतराव नाईकांना मिळाला आहे. त्या मालिकेत जाण्यात फडणवीस यशस्वी होणार काय हे त्यांच्या पन्नाशीतल्या पदार्पणातच निश्‍चित होणार आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळाले ते फडणवीस यांच्या रूपाने. या पक्षात निवडणुकांचे नेतृत्व करीत पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मान नरेंद्र मोदी, शिवराजसिंग चौहान, डॉ. रमणसिंह अशा नेत्यांनी मिळवला आहे. महाराष्ट्राची जनता हेच आपले दैवत असल्याचे सांगणारे फडणवीस फाईलीत रमतात, प्रश्‍न सोडवतात,योजना मार्गी लावतात. 

हे निर्णय प्रत्यक्षात उतरवणे हे त्यांच्या समोरचे आव्हान असेल. त्यांच्या आवाहनाला मान देत युतीत सामील झालेल्या शिवसेनेशी विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करून यशस्वी तोडगा काढणे ही मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी पहाणारे असेल असे मानले जाते. प्रत्येक आव्हानाचे संधीत रूपांतर करण्यात ते यशस्वी होतील असा विश्‍वास मंत्रिमंडळातील त्यांचे निकटचे सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्‍त केला. ते म्हणाले गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रात जे प्रश्‍न मार्गी लागले नव्हते ते सोडवण्याचे कसब फडणवीस यांनी साधले आहे. ते आज माझे नेते आहेत,त्यांचा माझा जुना संबंध ,माझ्यापेक्षा पाच वर्षाने लहान असलेल्या या सहकाऱ्याने आज जे साध्य केले आहे ,त्याही पेक्षा मोठे सन्मान त्यांना मिळोत या शुभेच्छा.वाढदिवसाला हारतुरे, गुच्छ स्वीकारण्यास फाटा देत फडणवीस यांनी हा निधी मुख्यमंत्री मदत निधीत समाविष्ट करावा असे आवाहन केले आहे. 

साधेपणा आवडणारे, बडेजाव टाळणारे फडणवीस त्यांच्या नियमाविरोधात काही झाले की न बोलता नापसंती दर्शवतात, ते लक्षात घेत उदया त्यांचे चहाते निधीलाच मदत करतील, असा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दैवताला महाराष्ट्रातील जनतेलाच निधीला दिलेल्या या वाढदिवस भेटीचा फायदा होईल हे निश्‍चित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra CM Devendra Fadnavis birthday celebration