...तर अजित पवारांना करावे लागणार स्वतःविरोधात मतदान

pawar.jpg
pawar.jpg

मुंबई : सध्या राज्यात मोठ्या खळबळजनक घटना घडत आहेत. भाजपने मध्यरात्री एक वाजता राष्ट्रपती राजवट हटवून सकाळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार याांनी शपथविधी घेतला. यानंतर राज्यात खळबळ उडाली.

राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केल्याने तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांना धक्का बसला. पक्षाचे विधिमंडळ गटनेतेपद असल्याने हजेरीसाठी घेतलेले आमदारांच्या सह्यांचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. यामुळे राष्ट्रवादीने अजित पवारांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, यामुळे अजित पवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेबाबत खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अंधारात होते. यामुळे पवारांना ही बाब खटकली आणि अजित पवारांसोबत असलेल्या 11 पैकी 8 आमदारांना परत पक्षात आणले. यानंतर राजकीय घडामोडी घडत गेल्या. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांचे आमदार मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे.

तर अजित पवार चर्चगेटमधील निवासस्थानी थांबलेले आहेत. आज सकाळी 11.30 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायदेतज्ञांच्या मते अजित पवार यांनी दिलेले ते पत्र राज्यपालांनी शहानिशा करून घेतलेले नाही.

यामुळे न्यायालयामध्ये ते टिकणार नाही. तसेच अजित पवार आता राष्ट्रवादीचे गटनेते राहिलेले नाहीत, पण राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यामुळे अजित पवार आमदारांसाठी व्हीप काढू शकणार नाहीत पण नवे गटनेते जयंत पाटील यांनी जर व्हीप काढला तर त्याला अजित पवार बांधिल राहणार आहेत, असे कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले.

यामुळे जर अजित पवारांनी बहुमत सिद्ध करताना राष्ट्रवादीविरोधात मतदान केल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होण्याचा धोका आहे. अजित पवार यांनी दोन तृतीयांश समर्थक आमदारांना घेऊन पक्षांतर केलेले नाही. यामुळे त्यांना हा कायदा लागू होतो. 

अजित पवार यांच्यासोबत गेलेले बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतलेले आहेत. यामुळे अजित पवारांना 54 पैकी 36 आमदारांचे समर्थन मिळविणे गरजेचे आहे. शरद पवारांनी केलेले डॅमेज कंट्रोल पाहता अजित पवार यांना आमदारांची पळवापळव शक्य दिसत नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com