जिल्हा सहकारी बॅंकांना दिलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका आणि टपाल कार्यालयांमध्ये पडून असलेल्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) स्वीकारणार आहे. यासाठी तीस दिवसांची मुदत दिली आहे. अशा प्रकारची अधिसूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने काढली असून, यामुळे सुमारे 2800 कोटींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना प्राप्त होणार आहे. या अधिसूचनेचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना फार मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जाते. 

केंद्रीय अर्थमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, की गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बॅंकांमध्ये आणि टपाल कार्यालयांमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बॅंकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील. जिल्हा बॅंकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणे बॅंकांना अवघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅंकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल. संपूर्ण राज्यात 27 जिल्हा बॅंकांकडे जुन्या नोटांच्या स्वरूपात 2771 कोटी रुपये इतकी रक्कम पडून आहे. रिझर्व्ह बॅंकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरूपातील रक्कम संबंधित बॅंकेच्या खात्यात जमा केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. नोटाबंदीनंतर देशातल्या 371 जिल्हा बॅंकांत चार दिवसांत 44 हजार कोटींची रक्कम जमा झाली. एकट्या महाराष्ट्रात 31 जिल्हा बॅंकांत 4600 कोटी रुपये जमा झाले होते. यात जुन्या चलनातली रक्कम देशात आठ हजार कोटी, तर राज्यात 2771 कोटी रुपये एवढी होती. 

नोटाबंदीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. एकाच वेळी ठेवीदारांच्या रकमा देणे आणि जुन्या नोटा "आरबीआय' स्वीकारत नसल्याने आर्थिक चणचण अशा दुहेरी कात्रीत या बॅंका सापडल्या होत्या. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा विषय देशभरात सरकारच्या विरोधात सुरू झाल्यावर कर्जमाफी करताना या बॅंकांना दिलासा देणे सरकारला भाग पडले. यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. 

नोटाबंदीनंतर... 
- देशातल्या 371 जिल्हा बॅंकांत चार दिवसांत 44 हजार कोटींची रक्कम जमा. 
- एकट्या महाराष्ट्रात 31 जिल्हा बॅंकांत 4600 कोटी रुपये जमा. 
- राज्यात 27 जिल्हा बॅंकांकडे जुन्या नोटांच्या स्वरूपात 2771 कोटी रुपये इतकी रक्कम पडून. 
- यात जुन्या चलनातली रक्कम देशात आठ हजार कोटी, तर राज्यात 2771 कोटी रुपये एवढी.

Web Title: maharashtra district co-operative bank