CM शिंदेंच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांची 'त्या' प्रकरणी मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

CM शिंदेंच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांची 'त्या' प्रकरणी मोठी कारवाई

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले. त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या दोन वेबसाईटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra FIR filed against 2 websites for allegedly publishing defamatory content against Savitri Bai Phule )

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांअंतर्गत इंडिक टेल्स आणि द हिंदू पोस्टच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे, ज्यात कलम 500 (मानहानीची शिक्षा) समाविष्ट आहे.

अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने करत सावित्रीबाई फुले यांच्यावरील आक्षेपार्ह लेखावरून दोन वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री शिंदेंनी दिले निर्देश

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे. तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणं गरजेचं आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही,” असा इशारा देतानाच “‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.