महाराष्ट्राची लोककला "यूपी'त सादर होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी महाराष्ट्रातून गेल्यानंतरही राज्याबरोबरचे सांस्कृतिक बंध जोपासले आहेत. 1 मे हा महाराष्ट्र दिन पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या राजधानीत लखनौमध्ये साजरा केला जाणार असून, महाराष्ट्राचे कलादर्शन तेथील नागरिकांसमोर सादर केले जावे यासाठी उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला निमंत्रण दिले आहे.

महाराष्ट्र दिनाला राज्याच्या लोककलेच्या दर्शनाचा कार्यक्रम लखनौत सादर केला जाणार आहे. यात भूपाळी, दशावतार, भारूड, नमन यांसारख्या लोककलांचा दोन तासांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच, 2 मे रोजी अरविंद पिळगावकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाविषयी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजय पाटील यांनी सांगितले, की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यात सामंजस्य करार झालेला आहे. 26 जानेवारीला देखील प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपण तिथे कलापथक पाठविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक बंध आहेतच, त्याला यानिमित्ताने उजाळा मिळावा आणि हे स्नेहबंध दृढ व्हावेत, अशी कल्पना आहे. राज्यपाल राम नाईक यांची ही मूळ कल्पना असून, या दोन्ही राज्यांमधील संबंध दृढ व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Web Title: maharashtra folk art UP