
ShivSena: शिवसेना-भाजपमध्ये मिठाचा खडा! शिंदे समर्थकांकडून भाजप नेत्याला बेदम मारहाण
मुंबईतील दहिसर पूर्व येथे बॅनर लावण्यावरून शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते विभिषण वारे यांना मारहाण केली, या मारहाणीत वारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वारे हे गेल्या 14 वर्षांपासून प्रकाश सुर्वे यांच्यासोबत काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातूनच हल्ला झाल्याचं विभीषण वारे यांनी म्हटलं आहे.
या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या मध्ये डझनभर लोक हातात काठ्या घेऊन दिसत आहेत. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच पोलिसांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत राजकीय सूडापोटीच वारे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तर भाजपा नेते विभीषण वारे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे.
हेही वाचा- अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....