फडणवीस सरकारची जाहिरातबाजी; मदतीच्या पॅकेटवरही यांचे फोटो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात आले आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती अजूनही धोक्याच्या पातळीवर असून मदतकार्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. मात्र, राज्यातील भाजप-शिवसेना सरकारकडून यामध्ये राजकारण करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात आले आहेत. सरकारच्या या जाहीरातबाजीबद्दल सोशल मीडियात जोरदार टीका करण्यात येत आहे. सरकार नागरिकांच्या  भावनांशी खेळत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

नेटीझन्सकडून सरकारला धारेवर धरले जात असून स्वत:चं कर्तव्य बजावतानाही जाहिरातबाजी करता का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगलीतील पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर, काहींनी जीवाला मुकावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पुरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती. मंंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा व्हिडिओवरून टीका होत असताना आता मदतीच्या पाकिटांवरील जाहिरातबाजीवरून सरकारवर टीका होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra government advertise in relief work at Kolhapur Sangli flood affected areas