घोळात घोळ सत्तास्थापनेचा

Politics
Politics

शिवसेनेला मुदतवाढ नाही; आता राष्ट्रवादीला निमंत्रण
मुंबई - अत्यंत नाट्यपूर्ण राजकीय घडामोडीत शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी, राज्यपालांनी दिलेल्या वेळेत काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यात अपयश आल्याने शिवसेना तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. आणखी दोन दिवसांचा वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती शिवसेनेने राज्यपालांना केली, मात्र ती विनंती फेटाळली त्यानंतर रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देऊन उद्या (ता. १२) रात्री साडेआठपर्यंत मुदत दिली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेना सत्ता स्थापन करणार यासाठी आज दिवसभर जोरदार हालचाली सुरू होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दुपारी भेट घेऊन सत्तास्थापनेबाबत पाठिंबा देण्याची सहमती दर्शविली होती. मात्र, दिल्लीत काँग्रेसच्या तब्बल पाच तास बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत एकमत झाले नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्याशी दुपारी दूरध्वनीवरून चर्चा केली. मात्र त्यानंतरही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी करून निवडणूक लढली असल्याने शरद पवार यांच्यासोबतच पुढची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. 

दरम्यान, या सर्व घडामोडीत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे इतर नेत्यांसोबत राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवन वर दाखल झाले. राज्यपालांनी सायंकाळी ७:३० वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्याअगोदरच शिवसेना नेते राजभवन वर दाखल झाले, मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र मात्र शिवसेनेसोबत नव्हते. आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना आणखी दोन दिवस मुदत वाढवून मागितली पण ती राज्यपालांनी नाकारली. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसचा निर्णय होत नाही तो पर्यंत शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंब्याचे पत्र द्यायचे नाही, असा निर्णय घेतला होता. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिवसभर काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहत होते. अखेर साडेसात वाजेपर्यंत काँग्रेसचा निर्णय झाला नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांना राजभवनावरून सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी पाठिंबा नसल्याने हात हालवत परत यावे लागले. 

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम राहिल्याने आता तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी विचारणा करतील असे मानले जाते. अन्यथा राष्ट्रपती राजवटी लागू करण्याची प्रक्रिया सुरू करतील असे बोलले जाते.

स्थिर सरकार देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सरकार स्थापनेसाठी दावा केला होता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत दिवसभर चर्चा सुरू होती. त्यांच्याबरोबरील चर्चा सुरू असल्याने आणखी दोन दिवसांची मुदत आम्ही मागितली होती. मात्र ती राज्यपालांनी नाकारली. 
- आदित्य ठाकरे, शिवसेना नेते

दिवसभराच्या मंथनानंतरही काँग्रेसचा निर्णय नाहीच
शिवसेनेला सरकारस्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत ‘हॅम्लेट’च्या भूमिकेत गेलेल्या काँग्रेस पक्षाने त्यांचा परंपरागत घोळ व आवसानघातकीपणा आज पुन्हा सिद्ध केला. दिवसभरात दोन वेळेस बैठका करून आणि सुमारे सहा-सात तासांचे विचारमंथन करूनही काँग्रेस पक्ष पाठिंब्याबाबत निर्णय करण्यात असमर्थ ठरला. 

भाजपने काल महाराष्ट्रात सरकारस्थापनेस नकार दिल्यानंतर दुसरा मोठा संख्याबळाचा पक्ष या नात्याने राज्यपालांनी शिवसेनेला चोवीस तासांची मुदत देऊन यासंदर्भातील निर्णय करण्यास सांगितले होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच्या आघाडीसाठी पार्श्‍वभूमी तयार करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सकाळीच त्यांचा राजीनामा सादर केला. यामुळे आता पुढील घडामोडी सुरळीत घडतील, अशी अपेक्षा केली जात होती. 

सकाळी दहा वाजता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाली. त्यामध्ये भरपूर ऊहापोह झाल्यानंतर चार वाजता पुन्हा बैठक होऊन त्यानंतर पक्षाची भूमिका निश्‍चित केली जाईल, असे सांगण्यात आले. मधल्या काळात सोनिया गांधी यांनी शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आलेल्या फोनना प्रतिसाद दिला. सोनिया गांधी व ठाकरे यांच्यात सुमारे पाच ते सात मिनिटांचे संभाषण झाल्याचे सांगण्यात आले; परंतु त्याचे स्वरूप केवळ सौजन्य एवढेच होते, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. यानंतर सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून बोलणी केली.

सोनियांचा विरोध कायम
चार वाजता बैठक सुरू झाल्यानंतर सोनिया गांधी जयपूरजवळच्या रिसॉर्टमध्ये थांबलेल्या काँग्रेस आमदारांशी संपर्क साधून प्रत्येकाबरोबर बोलणी करून त्यांचे मत जाणून घेतले. काँग्रेस गोटातील माहितीनुसार ४४ पैकी ४० आमदारांनी त्यांना शिवसेनेच्या सरकारला स्थापनेसाठी पाठिंबाच नव्हे, तर त्यात सहभागी होण्यास अनुकूलता दर्शविली; परंतु सोनिया गांधी यांनी या प्रस्तावाबाबत आपली प्रतिकूलता कायम ठेवली असे समजते. त्यामुळेच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पक्षाने एक लहानसे पत्रक काढून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे आणि यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणखी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.

बास झाली साठमारी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १७ दिवस उलटल्यानंतरही सत्ता स्थापन होत नसल्याबद्दल राज्यातील जनतेत आता संतापाची भावना निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर २४ ऑक्‍टोबरला निकाल लागला. त्यानंतर भाजप व शिवसेनेच्या युतीला जनादेश मिळाला. मात्र मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांचे बिनसले व त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केला नाही. त्यानंतर सर्वांत मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले व दावा करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली. या मुदतीनंतर भाजपने संख्याबळाअभावी नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण देऊन एक दिवसाची मुदत दिली. त्यांना मुदत वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला आणि त्यानंतर रात्री लगेच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले, त्यांनाही आता एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. सत्तेचा हा पोरखेळ लवकरात लवकर संपावा अशीच भावना जनता व्यक्त करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com