सरकार नरम; 19 आमदारांचे निलंबन मागे

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे या कारणास्तव आमदारांचे निलंबन केले होते.

मुंबई : सर्वच्या सर्व 19 आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत केली. बापट यांच्या घोषणेमुळे विधानसभेत 23 मार्चपासून झालेली कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

'निलंबनाच्या मुद्द्यावर 23 मार्चपासून विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे, विरोधी पक्षातील ९ आमदारांचे निलंबन मागे घेतले होते. त्यानंतरही विरोधकांचे बहिष्कार चालूच होते. मात्र, योग्य त्या सूचना देत आम्ही निलंबन मागे घेत आहोत,' असे बापट यांनी विधानसभेत सांगितले.

ते म्हणाले, 'लोकशाहीत काम करत असताना हे सभाग्रह आमच्याही बापाचे नाही; विरोधकांच्याही बापचे नाही. ते जनतेचे आहे. १९ आमदारांना शिस्तभंगामुळे निलंबित केले होते. त्यानंतर 9 आमदारांचे निलबंन मागे घेतले होते, मात्र तरीही विरोधकांचा बहिष्कार सुरूच होता. या मुद्द्यावर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, गटनेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केले.' 

अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी काँग्रेसच्या १० व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ सदस्यांचे गोंधळ घातल्याबद्दल ३१ डिसेंबरपर्यंत निलंबन केले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. 

'सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे या कारणास्तव आमदारांचे निलंबन केले होते,' असे बापट यांनी सागितले.

निलंबन मागे घेईपर्यंत विधीमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली होती. 23 मार्चपासून विरोधकांच्या रिकाम्या बाकांसमोरच विधानसभेचे कामकाज चालू होते. या पार्श्वभूमीवर बापट यांनी निलंबन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

निलंबित झालेले आमदार :
काँग्रेस

अमर काळे : आर्वी मतदारसंघ, वर्धा
विजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी, चंद्रपूर
हर्षवर्धन सकपाळ : बुलडाणा
अब्दुल सत्तार : सिल्लोड, औरंगाबाद
डी. पी. सावंत : नांदेड उत्तर
संग्राम थोपटे : भोर, पुणे
अमित झनक : रिसोड, वाशीम
कुणाल पाटील : धुळे ग्रामीण
जयकुमार गोरे : माण, सातारा

राष्ट्रवादी काँग्रेस
भास्कर जाधव : गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
जितेंद्र आव्हाड : कळवा, ठाणे
मधुसूदन केंद्रे : गंगाखेड, परभणी
संग्राम जगताप : नगर
अवधुत तटकरे : श्रीवर्धन, रायगड
दीपक चव्हाण : फलटण, सातारा
नरहरी जिरवाळ : दिंडोरी, नाशिक
वैभव पिचड : अकोले, नगर
दत्ता भरणे : इंदापूर, पुणे
राहुल जगताप : श्रीगोंदा, नगर

Web Title: Maharashtra government revokes suspension of 19 MLAs