Employees Strike: "ही मोठी गंभीर बाब..."; संपावरुन सुप्रिया सुळेंचे शासनावर आरोप
मुंबई : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी सरकारी कर्मचारी संपावर असून याचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या संपावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. राज्य शासनावर आरोप करताना त्यांनी ही गंभीर बाब असल्याचंही म्हटलं आहे. (Maharashtra Govt Employees Strike Supriya Sule accuses government)
सुळे म्हणाल्या, जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीवरुन शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. जुन्या पेन्शनबाबत सरकार वारंवार संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, ही मोठी गंभीर बाब आहे.
कर्मचारी संपावर असल्यामुळं प्रशासन ठप्प असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक महत्त्वाच्या सेवा या संपामुळं खंडीत झाल्या, त्या पुर्ववत होणं अतिशय गरजेचं आहे. शासनानं तत्परतेनं या सर्वांना विश्वासात घेऊन सन्मानजनक तोडगा काढण्याची गरज आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मंगळवारपासून सुरु आहे. संपामुळं आज दुसऱ्या दिवशीही राज्यातील कारभार ठप्प झाला आहे. दरम्यान, मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा संमत करण्यात आला असून आता या कायद्यांतर्गत सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई बडगा उगरण्यात येणार आहे. संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात मंगळवारी अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) घाईत मंजूर केला. संप करणाऱ्यांना ताक्ताळ अटक करण्याची तरतुद करण्यात आली आहे.