उद्योजकांमुळे महाराष्ट्र घडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra happened because entrepreneurs Former Chief Minister lauds Brands of Maharashtra initiative
उद्योजकांमुळे महाराष्ट्र घडला

उद्योजकांमुळे महाराष्ट्र घडला

पुणे : औद्योगिक, सेवा, शिक्षण, वैद्यकीय यासह सर्व क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पायाभूत सुविधा, योग्य प्रशासकीय निर्णय आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता असलेल्या उद्योजकांमुळे महाराष्ट्र घडला. तसेच इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे. विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण झालेली असताना यामध्ये ‘सकाळ’ने कायमच पूरक भूमिका घेऊन राज्याच्या विकासाला हातभार लावला आहे. यापुढेही उद्योजकांना, तरुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी ‘सकाळ’चा ‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ उपक्रम पुढे न्यावा अशा शब्दात राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. यातील महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, कृषी, अभियांत्रिकी, बांधकाम आदी विविध क्षेत्रातील ६३ ब्रँड्सचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुक्ष्म, लघु व मध्यम खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला.

महाराष्ट्राच्या स्थापनेला ६१ वर्ष झाले असताना, राज्याच्या प्रगतीला येथील उद्योग, व्यवसायांनी मोलाचा हातभार लावला आहे. देशात सक्षम व विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला घडविण्यासाठी अनेक ब्रँड्सचे मोलाचे योगदान आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात हिमतीने उद्योग उभारून, रोजगार देऊन स्वतःसह अनेकांच्या जीवनाचा उत्कर्ष केला, अशा ६३ उद्योजक, संस्थांचा सन्मान रविवारी ‘सकाळ’ने केला.

सकाळने सामाजिक क्षेत्रात मोठे काम उभे केले. त्याच पद्धतीने ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या उपक्रमातून राज्यातील कानाकोपऱ्यातील उद्योजकांना एक व्यासपीठ देऊन त्यांची नव्याने ओळख राज्याला करून दिली. उद्योजक व्यवसायी यांनी उभ्या केलेल्या संस्था आदर्श पद्धतीने काम करत असल्याचे समाजासमोर मांडून तरुणांना प्रेरणा देण्यासाठी प्रयत्न केले. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीचा आलेख मांडताना ‘सकाळ’च्या या उपक्रमाची विशेष दखल घेतली.

देशातील स्टार्ट अप इकोसिस्टीम मध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. उद्यमशीलता आणि कल्पकता याचा समन्वय साधून तरुण या क्षेत्रात दमदारपणे पाऊल ठेवत आहेत. अशावेळी या तरुणांना योग्य दिशा दाखवण्यासाठी ‘सकाळ’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. यातून आणि त्यावरून प्रेरणा घेऊन शून्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरित होतील, अशा शब्दात मान्यवरांनी ‘सकाळ’ची भूमिका आणि उपक्रमाचे कौतुक केले.

कौतुकाची थाप प्रेरणादायी

नवउद्योजकांना कौतुकाची थाप मिळणे हे त्यांच्यासाठी प्रेरणादायी असते. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’च्या माध्यमातून केलेला हा गौरव आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आपण काहीतरी चांगले काम करीत असल्याची पावती या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, अशी भावना गौरव झालेल्या ब्रँड्सने व्यक्त केली. राज्याच्या जडणघडणीत तसेच अनेकांना रोजगार उपलब्ध करीत असलेल्या या ब्रँड्सचा सातत्याने गौरव होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा देखील यावेळी या महाब्रँडचा सन्मान मिळालेल्या व्यावसायिकांनी व्यक्त केली. योग्य नेतृत्व आणि निर्णय क्षमता असेल आणि बाजारपेठेचा आवाका घेता आला तर व्यवसाय सोपा होतो. हे देखील नवउद्योजकांना या माध्यमातून समजेल असे मत पुरस्कारार्थीनी मांडले.

उद्योग-व्यवसायाची भरभराट

मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे सृजनशिल लोकांचे राज्य आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत आहे. जगातील विकसीत देशांमध्येही महाराष्ट्राचा नावलौकीक आहे. समाजातील अनेकविध घटकांना सहजतेने सामावून घेणारे हे सर्वसमावेशक असे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा केलेला राज्य कारभार हा माझ्यासमोर आदर्श होता. त्याच दृष्टीने राज्यकारभार करायचा प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात संयुक्त महाराष्ट्र वगळता काँग्रेसेतर शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात प्रथम आली. त्यात माझ्याकडे चार वर्षे मुख्यमंत्री पदाचा कारभार होता. शिक्षण, उद्योग क्षेत्रात राज्याची प्रगती अतुलनीय आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र खूप पुढे आहे. राज्याचे स्वरूप सर्वसमावेश आहे. मी रायगडसारख्या ग्रामीण भागातून येऊन मुंबईमध्ये उभा राहिलो. राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. ही संधी मला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. चार वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी शिवाजी महाराजांची नीती अवलंबून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या काळात राज्यातील उद्योग-व्यवसायाची भरभराट झाली.

राज्याच्या विकासासाठी वेळ द्या

नारायण राणे, माजी मुख्यमंत्री

राज्याला देशात अव्वल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा हा गौरव समारंभ आहे. मुख्यमंत्रीपदावरून राज्याचा कारभार नेमका कसा करायचा, याची दिशा यशवंतराव चव्हाण यांनी दाखविली. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. सर्व जाती धर्मातील उद्योजकांनी हे राज्य मोठे केले. मुंबई, पुणे, नागपूर येथे उद्योग बहरले. राज्याच्या जडणघडणीत या सर्वांचे योगदान आहे. देशाच्या तिजोरीत ३४ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. उद्योजकांच्या वाढीसाठी वीज, रस्ते, कायदा सुव्यवस्था अशा पायाभूत सुविधा आवश्यक असतात.

महाराष्ट्रात उद्योग आहेत; पण उद्योगात महाराष्ट्र कुठे आहे? राज्यातील १३ कोटी जनतेला राज्य सुरक्षित असेल पाहिजे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम खात्याचा मंत्री आहे, राज्यातील मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांना पत्र पाठविले, मला जागा पाहिजे, पण वेळ दिली नाही. अनुभवी माणसाने कोणी चुकत असेल तर कान पकडले पाहिजे. कोणत्या पक्षाचा नेता आहे हे पाहू नका. २००-२५० कोटी रुपयांचे उद्योग आहेत. तुम्ही फक्त जमीन द्या, बाकी सगळे आम्ही बघू. तुम्ही उद्योजकांनी केवळ आवाज द्या, आम्ही मदत करू. राजकारण बाजूला ठेवून काही वेळ राज्याच्या विकासासाठी वेळ द्यावा.

उद्योजकांची पूजा बांधण्याचा उपक्रम

सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील धडपडणारे, शून्यातून जग निर्माण करणाऱ्या उद्योजकांची पूजा बांधण्याचा हा गौरवास्पद उपक्रम आहे. ग्रामीण भागातील उद्योजक ३००-४०० कोटींचा व्यवसाय करत आहेत, याचे कौतुक आहे. गेल्या सहा दशकांमध्ये महाराष्ट्राला केवळ राजकीय शक्तीने नाही तर उद्योजकांनी स्वतःच्या हिमतीने उभे केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे ‘मेडिकल हब’ होण्याच्या दिशेने महाराष्ट्र शाश्वत पावले टाकत आहेत. कुशल डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळाची मोलाची मदत या क्षेत्राला मिळत आहे. त्यातही उद्योजकांची साथ मिळाली आहे.

राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले शरद पवार यांनी उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा वाढविण्याचे कार्य केले. महाराष्ट्राच्या विकासात त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र कोणत्या एका जाती-धर्माच्या कर्तृत्वाने उभा राहील नाही. तर, सर्व जाती-धर्माच्या कर्तृत्वावर उद्योजकांचा राज्याच्या वाढीत हातभार लागला आहे. सर्वधर्म समभाव हा या राज्याच्या मूळ गाभा आहे. राज्याच्या सत्तेवर अनेक सरकार येतील आणि जातील; पण शेकडो वर्षे जुन्या संस्था आहेत त्या राज्याच्या संपत्तीत भर घालत आहेत.

सेवा, उद्योगाची वाढ झाली पाहिजे

पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री

महाराष्ट्र ६१ वर्षांचा होत असताना उद्योगांनी प्रचंड प्रगती केली यात काही शंका नाही. ग्रामीण भागात छोट्या पातळीवर काम सुरू केलेले व आज यशाच्या शिखरावर निघालेल्या या ‘महाब्रँड्स’चे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आर्थिक, सामाजिक, राजकीय, वातावरण चांगले असल्यास राज्याची प्रगती होते. प्रत्येक राज्यात नवे उद्योग, सेवा केंद्र, माहिती तंत्रज्ञान कंपन्या येतील यासाठी स्पर्धा आहे. त्यामध्ये आपण खूप मोठे आहोत, अशी मानसिकता ठेवणे योग्य नाही. केंद्र सरकारने उद्योग वाढीसाठी सवलत देण्यासाठी प्रॉडक्टिव्हिटी लिंक इन्सेंटिव्ह (पीएलआय) ही योजना काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे.

त्यात वाढीव उत्पादनात निर्यातीवर सरकार पाच ते सात टक्के अनुदान देणार आहे, ही २.३४ लाख कोटी रुपयांची योजना आहे. देशात १४ ठिकाणी ही योजना राबविली आहे. पण, महाराष्ट्रात ही योजना आली नाही, याची मला चिंता वाटते. याचा राज्यातील नेतृत्वाचे गांभीर्याने विचार करावा. महाराष्ट्राचा विभागीय औद्योगिक असमतोल दूर झाला पाहिजे, हे उद्याच्या महाराष्ट्रापुढील मोठे आव्हान आहे. भविष्यात रोजगारासाठी फक्त शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही तर, सेवा आणि उद्योगाची वाढ झाली पाहिजे.

उद्योगांसाठी पोषक वातावरण

देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री

समाजात चांगले सुरू असलेले कार्य लोकांसमोर आणण्याचे काम सातत्याने ‘सकाळ’ करत आहे. शेती, शिक्षण, बांधकाम यासह सर्व क्षेत्रात वेगाने काम सुरू आहे. यात महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये ‘ब्रँड’ असलेल्यांचा सन्मान केला. व्यक्तीला संस्था मोठी करते, नंतर व्यक्ती संस्थेला मोठी करतो. २१व्या शतकात गुणवत्ता व विश्वासार्हता याला पैशांपेक्षा जास्त मोल आहे. पैसा वित्तीय संस्थेतून मिळतो, पण विश्वास, समृद्धी हे आपोआप मोठे होत नाहीत त्यासाठी प्रामाणिक कष्टाची जोड आवश्यक असते. पायाभूत सुविधा, उद्योग यामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. ही उत्तम ‘इकोसिस्टीम’ महाराष्ट्रात आहे.

उद्योजकांनी एकत्र प्रयत्न केल्याने विकास होतो. महाराष्ट्र ‘स्टार्टअप’ची राजधानी आहे. चीननंतर भारतात ‘स्टार्टअप’ आहेत. उद्योजकता व कल्पकता याचा सुंदर संगम आपल्या राज्यात दिसून येतो. कृषी क्षेत्रातील ‘स्टार्टअप’ आता पुढे येत आहेत. यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार झाले. उद्योगाच्या माध्यमातून देश आणि राज्याचा वेगाने विकास होत आहे. विकासाला हातभार लावणाऱ्या प्रमुख उद्योजकांचा गौरव करून ‘सकाळ’मुळे ते समाजासमोर आले. चांगल्यातून चांगले करण्याचा प्रयत्न आहे.

उद्योगाच्या माध्यमातून देश आणि राज्याचा वेगाने विकास होत आहे. विकासाला हातभार लावणाऱ्या प्रमुख उद्योजकांचा गौरव करून ‘सकाळ’मुळे ते ते समाजासमोर आले. चांगल्यातून चांगले करण्याचा प्रयत्न आहे.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.

Web Title: Maharashtra Happened Because Entrepreneurs Former Chief Minister Lauds Brands Of Maharashtra Initiative

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top