महाराष्ट्राला मनरेगाचे चार पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार' पुरस्काराअंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना "जलयुक्त शिवार' व "मागेल त्याला शेततळे' या योजनेअंतर्गत झालेल्या रोजगारनिर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे. 

मंगळवारी (11 सप्टेंबर) दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट कार्यालय अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलसिंचनातील उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

गडचिरोली जिल्हा हा मनरेगाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नाईक आणि विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना मनरेगा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. 
मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

श्रीमती नूतन प्रकाश उत्कृष्ट डाकसेवक 
ठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगाअंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

Web Title: Maharashtra has four awards for MNREGA