ST Journey : राज्यात दररोज अर्ध्या कोटी प्रवाशांची पसंती ‘लालपरीला’च; महिलांच्या ५० टक्के सवलतीचा निर्णय फायद्याचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

सर्वसामान्यांचा आधार म्हणून ओळखली जाणाऱ्या लालपरीतून मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत राज्यातील तब्बल ३४ कोटी नऊ लाख ३५ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

ST Journey : राज्यात दररोज अर्ध्या कोटी प्रवाशांची पसंती ‘लालपरीला’च; महिलांच्या ५० टक्के सवलतीचा निर्णय फायद्याचा

सोलापूर - सर्वसामान्यांचा आधार म्हणून ओळखली जाणाऱ्या लालपरीतून मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत राज्यातील तब्बल ३४ कोटी नऊ लाख ३५ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. दररोजची प्रवाशी संख्या ५७ लाखांहून जादा आहे. एसटी महामंडळाला दोन महिन्यात एक हजार ५३८ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. राज्य सरकारने महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिल्याने लालपरीचा खडतर प्रवास आता सुखकर होत आहे.

‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ हे ब्रीदवाक्य घेऊन परवडणाऱ्या दरात प्रवाशांची सेवा करणारी लालपरी आता खडतर मार्गावरून ऊर्जितावस्थेत येण्यासाठी संघर्ष करीत आहे. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला तिकीट दरात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास आणि आता प्रत्येक महिलेला तिकिटात ५० टक्के सवलत दिली जाते. अशा सवलती कोणतीच यंत्रणा देत नाही. त्यामुळे कोरोनानंतर घटलेली प्रवासी संख्या आता पूर्वपदावर आली आहे.

कोरोनापूर्वी १८ हजार बसगाड्या राज्यभर धावत होत्या आणि दररोज ६० ते ६६ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करीत होते. आता पाच हजार बसगाड्या कमी झालेल्या असतानाही ५७ लाखांवर प्रवासी दररोज लालपरीतून प्रवास करीत असल्याचे महामंडळाकडील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने १७ मार्चपासून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आणि दररोज चार ते साडेपाच लाख प्रवासी वाढले आहेत. पण, अजूनही महामंडळाचा खर्च दरमहा ८०० कोटींपर्यंत असून उत्पन्न मात्र ७५० कोटींपर्यंत आहे. हे व्यस्त प्रमाण बरोबर करण्यासाठी महामंडळाची धडपड सुरु आहे. त्यासाठी ‘प्रवासी मित्र’ नेमण्यात आले आहेत.

दुरुस्तीला पैसे नसल्याने पाच हजार बसेंस थांबून

एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण साडेअठरा हजारांवर बस आहेत. त्यातील १३ हजार बसगाड्या सध्या मार्गावरून धावत आहेत. पण, पाच हजारांवर बसगाड्या नादुरूस्त असल्याने यांत्रिकी विभागात थांबून आहेत. दुरुस्तीला पैसे नसल्याने अशी अवस्था आहे. सद्य:स्थितीत महामंडळाला दरमहा उत्पन्नाच्या तुलनेत ५० कोटींचा तोटा सोसावा लागतोय. त्यामुळे आहे तेवढ्याच गाड्यांवर सध्या वाहतूक सुरु आहे. राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत असल्याने अनेक गोष्टींवर मर्यादा येत आहेत, त्यापैकी दुरुस्तीसाठी पैसे नसणे ही एक गोष्ट.

‘एसटी’ची दोन महिन्यातील स्थिती

मार्गावरील बस - १३,०३९

दररोजचे प्रवासी - ५७.४४ लाख

दैनंदिन उत्पन्न - २६.३९ कोटी

दररोजचे महिला प्रवासी - ११.०९ लाख