Karnataka Border Dispute : बंगळुरू, बेळगावमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा द्या - संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut news
Karnataka Border Dispute : बंगळुरू, बेळगावमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा द्या - संजय राऊत

Karnataka Border Dispute : बंगळुरू, बेळगावमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा द्या - संजय राऊत

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून महाराष्ट्रातल्या काही गावांवर दावा सांगितला आहे. तसंच महाराष्ट्रात कन्नड भवन उभारण्याची घोषणाही केली आहे. त्यावरुनच संजय राऊतांना त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, "आमचा कानडी बांधवांशी कोणताही वाद नाही. मुंबईमध्ये कन्नड बांधवांसाठी अनेक हॉल्स आहेत, भवनं उभारण्यात आली आहे. आम्ही त्याला कधीही विरोध केला नाही. आमचा वाद नाही पण तो तुम्ही निर्माण करताय. हा जो सीमाभागाचा लढा आहे, तुम्ही गावांवर आता हक्क सांगू लागला आहे. कर्नाटक भवन बांधायला आमचा विरोध नाही. पण ते तुम्ही करणार असाल, तर आम्हालाही बंगळुरू आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या."

सीमावर्ती शाळांच्या विकासासाठी आपण १०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं. तसंच गोवा, सोलापूर आणि केरळमधल्या कासारगोडू इथं प्रत्येकी १० कोटी रुपये खर्चून कन्नड भवन उभारणार असल्याची घोषणाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात यायला बंदी असण्याचे आदेश देण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.