"महाराष्ट्र केसरी' चौधरी यांना आठवडाभरात नोकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नागपूर - सलग तीन वेळा "महाराष्ट्र केसरी' किताब पटकाविणारे विजय चौधरी यांचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. त्यांना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयावर आठवडाभरात कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

नागपूर - सलग तीन वेळा "महाराष्ट्र केसरी' किताब पटकाविणारे विजय चौधरी यांचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. त्यांना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयावर आठवडाभरात कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

"महाराष्ट्र केसरी'विजेते चौधरी यांचा अभिनंदनाचा ठराव फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आला. फडणवीस म्हणाले, की पुणे येथे झालेल्या 60 व्या "महाराष्ट्र केसरी' स्पर्धेत कुस्तीपटू चौधरी यांनी कुस्ती क्षेत्रातील मानाची स्पर्धा जिंकली. सलग तिसऱ्यांदा "महाराष्ट्र केसरी' किताब पटकावला. जळगाव जिल्ह्यातील सायगाव हे चौधरी यांचे मूळ गाव.

बालपणापासून कुस्तीची विलक्षण आवड त्यांना आहे. धुमछडी आखाडा आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचे ते मल्ल आहेत. चौधरी यांनी 2008 मध्ये "महाराष्ट्र महाबली' पुरस्कार, 2010 मध्ये "उत्तर महाराष्ट्र केसरी' पुरस्कार, "खानदेश केसरी' बहुमान, 2011 मध्ये "भगवंत केसरी कुस्ती' पुरस्कार, "त्रिमूर्ती केसरी' पुरस्कार या पुरस्कारांसह 2014 पासून सलग "महाराष्ट्र केसरी' स्पर्धांत ते जिंकत आहेत. त्यांच्या कामगिरीची दखल शासनाने घेतली आहे. त्यांना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून, आठवडाभरात कार्यवाही करण्यात येईल. विधान परिषदेचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Maharashtra Kesari Chaudhury job