उद्योगात महाराष्ट्रच 'लीडर' ! : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

नीती आयोगाने देशात सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक व रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाल्याचे अहवालात म्हटले आहे. पूर्वीच्या सरकारने त्याकडे लक्ष न दिल्याने महाराष्ट्र औद्योगिक कामगिरीत मागे होता. पण, आता आपण देशात अव्वल आहोत.

नागपूर : फडणवीस सरकारला शेती आणि उद्योगातील काही कळत नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असताना उद्योगात महाराष्ट्रच ‘लीडर‘ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या अहवालाचा दाखला देत स्पष्ट केले. सरकारच्या द्विवर्षपूर्तीच्याच दिवशी नीती आयोगाने जाहीर केलेल्या अहवालात शेती पणन इंडेक्‍समध्येही महाराष्ट्राला अव्वल क्रमांक देण्यात आला आहे. त्याचाही उल्लेख करीत द्विवर्षपूर्तीच्या आनंदात भर पडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

शहर भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सुरुवातीलाच नीती आयोगाच्या अहवालावर त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘शेती पणन इंडेक्‍समध्ये महाराष्ट्र अनेक वर्षे मागे होता. पण, यंदा 81 टक्‍क्‍यांसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्या राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या दहामध्ये आहे. याबाबतीत नीती आयोगाने आमची निराशा केली. कारण राज्य सरकारने दिलेले सात मुद्दे आयोगाने मान्य केले नाही. पण, महाराष्ट्राने सर्व प्रकारांमध्ये दुपटीने कामगिरी केली, याचा आनंद आहे.‘ जुन्या सरकारचा दाखला देत उद्योग आणि गुंतवणुकीसंदर्भात ते म्हणाले, ‘नीती आयोगाने देशात सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक व रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाल्याचे अहवालात म्हटले आहे. पूर्वीच्या सरकारने त्याकडे लक्ष न दिल्याने महाराष्ट्र औद्योगिक कामगिरीत मागे होता. पण, आता आपण देशात अव्वल आहोत.‘ राज्य सरकारने दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1800 कोटी रुपये दिले आणि 80 लाख शेतकऱ्यांना विमाधारक केले, याचाही उल्लेख त्यांनी केला. 

पिक्‍चर अभी बाकी है - गडकरी 
विकासकामांचा उल्लेख करीत राहिलो तर अख्खी रात्र जाईल, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी भाषणात केला होता. त्यावर नितीन गडकरी यांनी राज्याच्याच नव्हे तर नागपुरातील विकासकामांची यादी वाचायलाही रात्र अपुरी पडेल, असे म्हटले. राज्य सरकारच्या कामगिरीचे कौतुक करीत नितीन गडकरी यांनी ‘हा तर केवळ ट्रेलर होता, पिक्‍चर अभी बाकी है‘ असा डायलॉग मारला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: Maharashtra leads in business, says CM Devendra Fadnavis