कुरघोडीचा डाव उलटला

Legislative Assembly
Legislative Assembly

"राष्ट्रवादी'ला दणका; भाजप-शिवसेनेला फायदा
मुंबई - विधान परिषद सभागृहात संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान पेलताना मित्रपक्षावरच कुरघोडी करण्याचा डाव राष्ट्रवादी कॉंग्रेसवर उलटला असून, आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी बाजी मारण्यात यश मिळवले आहे.

कॉंग्रेसवर कायम दबावतंत्राचा वापर करत विधान परिषदेत अधिक जागा पटकवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला या निवडणुकीत तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत, तर कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेला प्रत्येकी एका जागेचा फायदा झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहा जागांसाठीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सांगली-सातारा व भंडारा-गोंदियात पराभव स्वीकारावा लागला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जागावाटपाचे सूत्र बिघडल्याने या दोघांच्या वादात शिवसेना व भाजपचा मात्र फायदा झाला आहे, तर कॉंग्रेसला एकही जागा मिळणार नाही, अशी खेळी करूनही कॉंग्रेसने नांदेड व सातारा-सांगलीत विजय खेचून आणला आहे.

भंडारा-गोंदियात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक परिणय फुके यांचा विजय झाला असून, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय खेळीने सर्व पक्षीयांचा पाठिंबा असलेल्या श्‍यामसुंदर शिंदे यांचा धक्‍कादायक पराभव झाला आहे. सातारा-सांगलीत अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते फोडत माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहन कदम यांनी बाजी मारली आहे. यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते प्रा. तानाजी सावंत यांनी कॉंग्रेसचे शंकर बढे यांच्यावर एकतर्फी विजय मिळवला.

विधान परिषदेच्या सहा मतदारसंघांत जळगाव वगळता इतर सर्वच ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकत्रित संख्याबळ शिवसेना व भाजप युतीपेक्षा कितीतरी अधिक होते. जागावाटपात कॉंग्रेसने यवतमाळ व सातारा-सांगलीसह नांदेड हे तीन मतदारसंघ मागितले होते. मात्र, ते देण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसने नकार दिला. यवतमाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत विद्यमान आमदार संदीप बजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर कॉंग्रेसने भंडारा-गोंदियात कॉंग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांनी उमेदवारी कायम ठेवली. अखेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी यवतमाळमध्ये शिवसेना उमेदवार तानाजी सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला. त्या बदल्यात पुणे व सातारा-सांगलीत शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देईल, अशी अटकळ बांधली होती. मात्र, पुणे वगळता सातारा-सांगलीत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी राजकीय धूर्तपणाने बाजी मारत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धूळ चारली.

नांदेडमध्ये तर कॉंग्रेस विरुद्ध सर्व पक्ष असा सामना होता. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-एमआयएम अशी अप्रत्यक्ष महायुतीच कॉंग्रेसचे अमर राजूरकर विरोधात उभी होती. तरीही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावत कॉंग्रेसला विजय मिळवून दिला.

जळगावमध्येही भाजपविरुद्ध सर्वपक्षीय अपक्ष असा सामना होण्याची शक्‍यता होती. पण, एकनाथ खडसे यांच्या विरोधातील उमेदवार असतानाही अखेरच्या क्षणी भाजपच्या नेत्यांनी खडसे यांना "उमेदवार विजयी झालाच पाहिजे' असे सांगितल्याने भाजपचे चंदुलाल पटेल यांचा विजय सोपा झाल्याचे मानले जाते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली असती, तर सर्वच्या सर्व सहा जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला मिळाल्या असत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भूमिका बदलली नसती तर आज चित्र वेगळे दिसले असते.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

विजयी उमेदवार, पक्ष व त्यांना मिळालेली मते -
- नांदेड - अमरनाथ अनंतराव राजूरकर (कॉंग्रेस, मते 251)
- सांगली-सातारा - मोहन श्रीपती कदम (कॉंग्रेस, मते 309)
- यवतमाळ - तानाजी जयवंत सावंत (शिवसेना, मते 348)
- पुणे - अनिल शिवाजीराव भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस, मते 440)
- जळगाव - चंदुलाल विश्रामभाई पटेल (भाजप, मते 421)
- भंडारा-गोंदिया - डॉ. परिणय रमेश फुके (भाजप, मते 220)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com