LIVE Marathi News Updates: 'समीर वानखेडे भाजपची पोलखोल करू शकतात', नाना पटोलेंचे गंभीर आरोप |LIVE Marathi News Updates Maharashtra Breaking News LIVE marathi latest news Marathi Breaking News Mumbai live Updates Latest Marathi News Headlines Marathi News Headlines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

जयंत पाटलांची आजची चौकशी संपली

९ तासांनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाच्या बाहेर पडले असून त्यांची आजची चौकशी संपली आहे.

नितेश राणे उद्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती करणार

भाजप नेते नितेश राणे उद्या नाशिक दौऱ्यावर जात आहेत. मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या त्र्यंबकेश्वर मुद्द्यावरुन रान पेटण्याची शक्यता आहे. कारण उद्या राणे मंदिरात महाआरती करणार आहेत.

नोटबंदीचा निर्णय लहरी माणसासारखा- शरद पवार

दोन हजाराची नोट बंद केली. लहरी माणसासारखे निर्णय घेतले जात आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पुण्यातून मोदी सरकारला धारेवर धरलं.

हिंगोलीत तरुण शेतकऱ्याने पैसे उधळले

नामदेव पतंगे या तरुणाने घरातील दागिने मोडून त्या पैशांची कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये उधळण केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस खतांचं प्रकरण गाजत आहे. तक्रार करुनही कृषी कार्यालय अशा कंपन्यांवर कारवाई करत नाही. त्यामुळे संतापलेल्या तरुण शेतकऱ्याने सोनं मोडून मिळवलेले टोपलीभर पैसे उधळले.

दिल्ली सीबीआयची टीम वानखेडेंची करणार चौकशी

समीर वानखेडेंना सीबीआयकडून २४ मे रोजीचं समन्स देण्यात आलेलं असून दिल्ली सीबीआयची एक टीम त्यांची चौकशी करणार आहे.

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच खुला होणार

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा २६ मे रोजी खुला होणार आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये अशी कुठलीही परंपरा नाही- तुषार भोसले

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिम बांधवांची परंपरा असल्याचे पुरावे द्या, अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार भोसले यांनी केली आहे. शंभर वर्षांची परंपरा असल्याचा संजय राऊतांचा दावा भोसलेंनी फेटाळला आहे.

'समीर वानखेडे भाजपची पोलखोल करू शकतात', नाना पटोलेंचे गंभीर आरोप

समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. आर्यन खान प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी वानखेडे यांचा भाजपशी संबंध असल्याचं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांच्या चौकशी मागे दाल में जरुर कुछ काला है!, वानखेडेंजवळ भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतो अशा काही वस्तू असल्याचे नाना पटोले म्हणालेत.

मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात घराला लागली भीषण आग; आगीत 4 जण जखमी

ठाण्याजवळील मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत आग लागल्याची घटना घडली आहे. चाळीतील दोन घरांना लागलेल्या आगीत एकूण 4 जण जखमी असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एक पुरुष, एक महिला आणि 2 लहान मुलांचाही समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले. चाळीतील घरे खाली करण्यात आली आहेत. या ठिकाणाहून चाळीच्या वरून जाणारी हाय टेन्शन वायर पडल्याने सदर आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

समीर वानखेडे यांना दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलं संरक्षण

समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. सीबीआयने उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. 8 जून पर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

समीर वानखेडेंना अटक होणार?

२२ मे पर्यंत वानखेडे यांना सीबीआयला आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. ही मुदत आज संपत आहे. त्यामुळे वानखेडेंना आज अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सांगली-मिरजमध्ये रस्त्यांवर राष्ट्रवादीचे रास्तारोको 

सांगली-मिरजमध्ये रस्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केलं आहे. जयंत पाटील यांची आज ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

जयंत पाटील ईडी कार्यालयात दाखल 

जयंत पाटील ईडी कार्यालयात दाखल झाले असून IL&FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबई दाखल; पोलिसांचा बंदोबस्त

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ED चौकशीला हजर राहण्याआधीच जयंत पाटलांचं ट्वीट

“आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे, असं जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हंटलं आहे.

देवदर्शनावरून घरी परतताना भीषण अपघात; ३ भविकांचा मृत्यू तर ७ जण जखमी

विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावमधील भाविकांच्या वाहनाला घरी परतत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात ३ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहे. (Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळच हा अपघात घडल्याची माहिती आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविक आपल्या वाहनाने आले. यावेळी त्यांची चारचाकी कार शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. यामध्ये ३ भाविक जागीच ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. सांगली, पुणे आणि नाशिकमध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

जयंत पाटील आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी राहणार हजर

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. IL&FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मात्र, याप्रकरणाशी आणि आपला संबंध नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

पुढील 3 दिवस राज्यातील या भागांमध्ये पावसाची शक्यता

राज्यातील काही भागांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर