
Shambhuraj Desai Corona Positive: मंत्री शंभूराज देसाईंना कोरोनाची लागण
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं त्यांनी स्वतःच जाहीर केलं आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणीचा सल्ला दिला आहे.
शंभूराज देसाई यांनी ट्विट करत सांगितलं की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृहविलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असं मी आवाहन करतो.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देखील कोरोनाची लागण झाली असून सकाळी त्यांनी आपल्या ट्विटद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर मंत्रिमंडळातील देसाईंना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नुकतंच विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं यावेळी हे सर्वच नेते सभागृहात उपस्थित होते. त्यामुळं आमदारांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतोय
दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होते आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये कोरोना रुग्ण गतीने वाढत आहेत. सध्या राज्यात २ हजार ३४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. डिसेंबर २०२२ पासूनच मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरु आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४५० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली.