कोश्यारी यांच्या पेक्षा कमी नाहीत रमेश बैस; नव्या राज्यपालांची कारकिर्द आहे वादाची: New Governor Ramesh Bais | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Governor Ramesh Bais

New Governor Ramesh Bais: कोश्यारी यांच्या पेक्षा कमी नाहीत रमेश बैस; नव्या राज्यपालांची कारकिर्द आहे वादाची

वादग्रस्त विधानांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राजीनामा स्विकारण्यात आला. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बैस यांचीही राजकीय कारकिर्द वादाच्या भूमिने गाजलेली आहे.

बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते.

New Governor Ramesh Bais: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

झारखंड सरकार आणि राज्यपाल वाद

मेश बैस यांचा झारखंड सरकारशी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होतो. रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले 'झारखंड वित्त विधेयक-2022' दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

राज्यपाल बैस यांना न सांगताच बदलला होता प्रधान सचिव तेव्हा..

मागील वर्षी राज्यपाल बैस यांना न सांगताच त्यांचा प्रधान सचिव बदलण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बैस यांच्याद बाचाबाची झाली.

आपल्या प्रधान सचिवांच्या बदलीबाबत राज्यपाल बैस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न सांगताच त्यांचा प्रधान सचिव बदलण्यात आल्याने बैस यांनी थेट प्रभारी मुख्य सचिव अरुणकुमार सिंह यांना जाब विचारला.

कारण न विचारता त्यांचे प्रधान सचिव नितीन मदन कुलकर्णी यांची बदली का करण्यात आली. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. सुरू करण्यात आलेली ही प्रथा योग्य नसल्याचे ते त्यावेळी म्हणाले होते.

झारखंडच्या 22 व्या स्थापना दिन सोहळ्याला राज्यपाल बैस यांची दांडी

झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा परिणाम राज्याच्या 22 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यावरही दिसून आला. राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र ते आलेच नाहीत.

झारखंडच्या स्थापना दिना दिवशी राज्यपाल गैरहजर राहणे २२ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ. त्यांच्या जागी झामुमोचे सुप्रीमो आणि राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांना प्रमुख पाहुणे बनवण्यात आले.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित खाण लीजबाबत निवडणूक आयोगाचे कार्यालय ऑफ प्रॉफिट प्रकरणी पत्र आणि मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर खाण प्रकरणी ईडीचे समन्स ही दोन प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे राज्यपाल सरकारी कार्यक्रमांपासून दुर राहिलेत.

झारखंडमध्ये कधीही 'अणू बॉम्ब' फुटू शकतो

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यपाल रमेश बैस यांनी, दिल्लीत फटाक्यांना बंदी आहे, पण झारखंडमध्ये कधीही 'अणू बॉम्ब' फुटू शकतो. राज्यपालांचे हे विधान झारखंडच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. मात्र, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी राज्यपाल बैस यांच्यावर अनेक आरोप केले. बैस यांचे हे वक्तव्य त्यांच्या पदाला शोभणारे नाही. अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

राजकीय कारकिर्द

रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आलं होतं.

त्रिपुरात दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.