एसटी लवकरच हाेणार चकाचक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई - डिसेंबरअखेरपर्यंत राज्यातील सर्व बस आणि एसटी स्थानके चकाचक होणार आहेत. एसटी महामंडळाच्या स्वच्छता प्रकल्पाद्वारे राज्यातील ५३८ बसस्थानके आणि २५० आगार परिसर रोज स्वच्छ ठेवला जाणार आहे. त्यासाठी वर्षाला १३५ कोटींचे कंत्राट एसटी महामंडळाने दिले आहे. 

मुंबई - डिसेंबरअखेरपर्यंत राज्यातील सर्व बस आणि एसटी स्थानके चकाचक होणार आहेत. एसटी महामंडळाच्या स्वच्छता प्रकल्पाद्वारे राज्यातील ५३८ बसस्थानके आणि २५० आगार परिसर रोज स्वच्छ ठेवला जाणार आहे. त्यासाठी वर्षाला १३५ कोटींचे कंत्राट एसटी महामंडळाने दिले आहे. 

संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्प पुढे करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाला शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केला आहे. संत गाडगेबाबा आणि आर. आर. पाटील यांचे नाव जोडत स्वच्छता अभियान राज्यात अगोदरपासूनच सुरू असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. स्वच्छता दिन देशभर साजरा होत असतानाही पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाचा एसटी महामंडळाच्या कार्यक्रमात नामोल्लेख टाळत संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ कुर्ला नेहरूनगर बसस्थानकात नुकताच करण्यात आला. परिवहनमंत्री दिवाकर रावते, मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित होते.

डिसेंबरअखेर राज्यातील सर्व बस आणि बसस्थानके चकाचक करणार असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटी आणि एसटीची स्थानके स्वच्छ राहण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत विनोद तावडे यांनी व्यक्त केले. प्रचार आणि प्रबोधनाच्या माध्यमातूनच स्वच्छतेचे महत्त्व सर्वांवर बिबंवले जाईल, असे विचार सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. एसटी माझी आहे, अशी भावना प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोपर्यंत रुजत नाही, तोपर्यंत ही बाब शक्‍य नाही. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मांडले.

Web Title: maharashtra new MSRTC ST bus