सेवासमाप्तीनंतर पुन्हा नियुक्‍त्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - एसटीच्या अघोषित संपात सहभागी झाल्याने सेवा समाप्त केलेल्या एक हजार दहा रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्यानुसार अशा सर्व कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याचे आदेश महामंडळाने सोमवारी संबंधित स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. 

या सर्व कर्मचाऱ्यांना एक जुलै 2018 पासून नव्याने नियुक्ती दिली जाणार आहे. त्यांना सेवेत घेण्याच्या निर्णयाचे मान्यताप्राप्त संघटनेने स्वागत केले असले, तरी आधीची सेवा संपवून पुन्हा नव्याने नियुक्ती कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता; तरीही ते संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान; तसेच प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत महमंडळाने या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती. 

या निर्णयावरून महामंडळाविरोधात कामगार संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली होती. परिवहनमंत्र्यांच्या निर्देशानुसार महामंडळाने या कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्‍चित केले आहे. या संदर्भातील परिपत्रक सोमवारी जारी करण्यात आले. 

सेवामुक्त केलेल्या कामगारांना सेवेत घेण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे; पण एक जुलैपासून नव्याने नेमणूक दिली जाणार आहे हे योग्य नव्हे. त्यांची आधीची सेवा गृहीत धरावी यासाठी संघटना पाठपुरावा करेल. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना 

Web Title: maharashtra new st employee Re-appointments after the service expires