अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

गुळुंचे - पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथे पुणे-पंढरपूर रस्त्यावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास वाहनाला ओव्हरटेक करताना दहा चाकी ट्रेलर व दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला; तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  

गुळुंचे - पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथे पुणे-पंढरपूर रस्त्यावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास वाहनाला ओव्हरटेक करताना दहा चाकी ट्रेलर व दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला; तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  

याबाबत पोलिसांनी माहिती दिली, की पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील गोपीनाथ जगन्नाथ बरकडे (वय ३२) हे पत्नी नीलम, मुले ओम, पार्थ व मुलगी जननी यांना दुचाकीवर घेऊन नीरेकडे आधार कार्ड लिंक करण्यासाठी चालले होते. त्या वेळी पिंपरे खुर्द येथे पुणे-पंढरपूर रस्त्यावर पुढे जाण्यासाठी चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दहा चाकी ट्रेलरचा अंदाज न आल्याने दुचाकी व ट्रेलर यांच्यात अपघात झाला. या अपघातात गोपीनाथ यांच्या पत्नी नीलम (वय २८), मुले ओम (वय तीन) व पार्थ (वय दोन) यांचा जागीच मृत्यू झाला; तर गोपीनाथ (वय ३२) व मुलगी जननी  (वय ५) हे गंभीर जखमी झाले आहेत. गोपीनाथ यांना उपचारासाठी लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील रुग्णालयामध्ये दाखल केले असून, मुलगी जननी हिला नीरेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नीरा पोलिस दूरक्षेत्राचे सुदर्शन होळकर, देवेंद्र खाडे, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, रामचंद्र कर्नवर व पोलिस मित्रांनी घटनास्थळी भेट दिली. पेट्रोलिंग करणारे कर्मचारीही वेळेत मदतीला धावले. त्यामुळे जखमींना पुढील उपचारांसाठी लवकर हलविणे शक्‍य झाल्याचे होळकर यांनी सांगितले. 

या घटनेनंतर जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.  तसेच, दवाखान्यात जाऊन जखमींची चौकशी केली.

Web Title: maharashtra news accident