कृषी विद्यापीठांमधील पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पुणे - राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या 15 हजार 267 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या शैक्षणिक वर्षात 420 जागा वाढल्या आहेत. 

पुणे - राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या 15 हजार 267 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या शैक्षणिक वर्षात 420 जागा वाढल्या आहेत. 

""डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) या चार विद्यापीठांमधील पदवी प्रवेशाची प्रक्रिया 15 जूनपासून आम्ही सुरू केली आहे. 10 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येतील,'' अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे संचालक डॉ. श्रीकांत काकडे यांनी दिली. 

डॉ. काकडे म्हणाले, की राज्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे टपाल किंवा कुरिअरने कागदपत्रे पाठविण्यात विद्यार्थ्यांची होणारी दमछाक टळणार आहे. प्रवेश अर्जासोबत खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ठरविलेले पाचशे रुपये शुल्कदेखील ऑनलाइन भरण्याची सोय यंदा राहील. 

परिषदेचे महासंचालक डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पद्धतीने कृषी विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. इंग्रजी माध्यम असलेल्या विविध आठ पदवी अभ्यासक्रमांसाठी सुरू झालेल्या या पदवीच्या प्रवेशासाठी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी किमान 16 वर्षे वय, खुल्या प्रवर्गासाठी किमान 50 टक्के गुण, तर आरक्षित प्रवर्गासाठी 40 टक्के गुण बंधनकारक ठेवण्यात आले आहेत. राज्यात 156 खासगी विनाअनुदानित महाविद्यालये असून, यंदा 12 हजार 520 जागांसाठी प्रवेश दिले जातील. याशिवाय 35 शासकीय महाविद्यालयांमधील दोन हजार 747 जागा भरल्या जातील, असे परिषदेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित उपलब्ध जागा 
विद्याशाखा---अनुदानित जागा---विनाअनुदानित जागा 
कृषी---2012---7890 
उद्यानविद्या---200---560 
वन्यशास्त्र---64---0 
मत्स्यशास्त्र---40---0 
कृषी जैवतंत्रज्ञान---80---1000 
पशुसंवर्धन---0---30 
अन्न तंत्रज्ञान---64---1520 
कृषी अभियांत्रिकी---247---880 
गृहविज्ञान---40---0 
कृषी व्यवसाय व्यवस्थापन---0---640 

Web Title: maharashtra news agriculture