कपाशी, मक्‍याच्या पेऱ्यांत वाढ

कपाशी, मक्‍याच्या पेऱ्यांत वाढ

पुणे - राज्यात मॉन्सून सर्वत्र पसरला असून, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंतच्या पेरण्या दुपटीने पुढे गेल्या आहेत. राज्यात १५२ लाख हेक्‍टरपैकी १७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. काही भागांमध्ये अपेक्षित पावसाअभावी मुगासह अन्य कडधान्याचा पेरा घटण्याची शक्‍यता आहे.

खरिपाच्या प्रमुख पिकांचा गेल्या हंगामात २३ जूनपर्यंतचा पेरा १३.२२ लाख हेक्‍टरवर होता. यंदा आतापर्यंत २५.६५ लाख हेक्‍टवर पेरा आहे. मका आणि कपाशीचा पेरा सर्वात वेगाने होत आहे. यंदा खरिपाच्या १५२ लाख हेक्‍टरपैकी कापूस पेरा ३५ लाख हेक्‍टरवर, तर सोयबीनचा पेरा ३० लाख हेक्‍टरवर राहील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. आतापर्यंत या अंदाजानुसार, साडेबारा लाख हेक्‍टरवर कापूस तर सव्वासहा लाख हेक्‍टवर सोयबीनची पेरणी पूर्ण झाली आहे.

मुगाचा पेरा घटणार
काही भागांमध्ये कडधान्यासाठी अपेक्षित पाऊस नसल्यामुळे मुगाचा पेरा घटण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कपाशीला प्राधान्य देतांना दिसतोय, असे बियाणे उद्योगातील सूत्रांचे निरीक्षण आहे. मान्सूनची वाटचाल मंदावल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये मुगाचे पेरणी वेळापत्रक विस्कळित झाले आहे. कृषी विभागानेदेखील मुगाची पेरणी अवघी १४ टक्के झाल्याची नोंद केली आहे. उडदाचा पेरा ११, तर मक्‍याचा पेरा २८ टक्के झालाय, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘महाबीज’मधील अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, राज्यात कपाशीचा ७० ते ८० टक्के पेरा आटोपला आहे. यंदा कपाशीचा पेरा खानदेशात २५ टक्‍क्‍यांनी, तर विदर्भ, मराठवाडा भागात १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढू शकतो. मान्सून काहीसा उशिरा पसरत असला तरी उडीद, सोयबीन व कपाशीचा पेरा १०-१५ जुलैपर्यंत चालू राहू शकतो.

भात रोपवाटिकांची कामे संथ
नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर अशा भात उत्पादक पट्ट्यात चांगला पाऊस झालेला नाही. तेथे भात रोपवाटिका संथपणे तयार होत आहेत. राज्यात १५.२५ लाख हेक्‍टरवर भात लागवड होत असून, आतापर्यंत अवघ्या ५७ हजार हेक्‍टरवर लागवड झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना मुख्य अडचण पीककर्ज उपलब्धतेची आहे. यंदा शेतकऱ्यांना एकूण ७७ हजार कोटींचे कृषिकर्ज वाटण्याचे उद्दिष्ट असून, त्यात ५४ हजार कोटी रुपये पीककर्जाचे आहेत. मात्र, कर्जमाफीच्या वातावरणानंतर बॅंकांची वसुली ठप्प होऊन शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे कर्जवाटप घटले आहे. दुसऱ्या बाजूला ‘जीएसटी’मुळे शेतकऱ्यांना खताच्या किंमतवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. राज्यात खतावर पाच टक्के व्हॅट होता. १२ टक्के ‘जीएसटी’मुळे किंमती वाढणार असून, निश्‍चित कशाप्रकारे किंमतवाढ राहील याची चाचपणी सुरू आहे. मात्र, एकूण किंमतीत सहा टक्के वाढ होऊ शकते, अशी माहिती ‘आरसीएफ’च्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com