स्मारकाचे काम महिनाभरात सुरू  - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. संविधानामुळे शक्तीशाली देश निर्माण झाला. जगात भारताकडे कौतुकाने पाहिले जाते. देशातील दीन दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकांपर्यंत परिवर्तन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शस्त्र दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

दरम्यान, दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Web Title: maharashtra news Ambedkar memorial work will start within a month Maharashtra CM Devendra Fadnavis