बिल्डरवर कारवाई करण्यासाठी आशिष शेलारांचा विधानसभेत ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सांताक्रूझ इथल्या खोतवाडी, भिमवाडा एसआरए योजनेतील जमीन बिल्डरने एलआयसीकडे तारण ठेवून २०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले. मात्र बिल्डर हे पैसे परत करू शकला नाही. आता पैसे वसुल करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या मालकीचा भूखंड विक्री करायला काढला आहे.

मुंबई : एसआरएची फसवणूक करून बिल्डरने २०० कोटी रुपये लाटल्याचा आरोप करत, या बिल्डरवर कारवाई करण्यासाठी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत वेलमध्ये उतरून ठिय्या आंदोलन केले. 

आशिष शेलार म्हणाले, की सांताक्रूझ इथल्या खोतवाडी, भिमवाडा एसआरए योजनेतील जमीन बिल्डरने एलआयसीकडे तारण ठेवून २०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले. मात्र बिल्डर हे पैसे परत करू शकला नाही. आता पैसे वसुल करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या मालकीचा भूखंड विक्री करायला काढला आहे. झोपडपट्टीवासियांच्या जीवावर बिल्डर कर्ज घेतात आणि त्या सातबाऱ्यावर बँकेचं नाव लागतं असेल. सरकार उत्तर देतं त्यांनी केलेल्या व्यवहाराला आम्ही बांधिल नाही. मुंबईत अनेक एसआऱए योजनेच्या जमिनी तारण ठेवून अशाप्रकारे बिल्डरांनी आठ ते दहा हजार कोटी रुपये उचलले आहे. या प्रकरणाची स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन अधिकाऱ्याकडे चौकशी द्यावी, ईडीमार्फत चौकशी करावी.

यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता म्हणाले, की विशेष अधिकारी नियुक्त करून १५ दिवसात चौकशी सुरू करण्यात येईल. १५ दिवसात ही झोपडपट्टी योजना मार्गी लावली जाईल. एलआयसीची फसवणूक केली असेल तर  स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन अधिकाऱ्याकडे चौकशी देऊ.

Web Title: Maharashtra news Ashish Shelar agitation on SRA fraud