ई-बालभारतीचे काम लवकरच होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था असलेली बालचित्रवाणी कायमस्वरूपी बंद करून ई-बालभारती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; परंतु अद्यापही ई-बालभारती सुरू झाली नसल्याबद्दलचा प्रश्‍न विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ई-बालभारती लवकरच सुरू होईल, अशी माहिती दिली.

मुंबई - शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था असलेली बालचित्रवाणी कायमस्वरूपी बंद करून ई-बालभारती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; परंतु अद्यापही ई-बालभारती सुरू झाली नसल्याबद्दलचा प्रश्‍न विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ई-बालभारती लवकरच सुरू होईल, अशी माहिती दिली.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रश्‍नोत्तर सत्र सुरू करण्याचे घोषित केले. या वेळी सभागृहाचे सदस्य सुनील तटकरे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर लेखी उत्तर देताना तावडे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या शंभर टक्के अनुदानावर बालचित्रवाणी संस्था कार्यरत होती; परंतु हे अनुदान बंद पडल्यामुळे संस्थेचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि देखभाल दुरुस्ती राज्य सरकारकडून केली जात होती; परंतु स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली. सरकारकडे निधी नसल्यामुळे आणि ५० पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे ही संस्था उद्योग या संज्ञेत येत नसल्याने कायमस्वरूपी बंद करून ई-बालभारती या नव्या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक कलह कायदा १९४७ नुसार एक महिना आगाऊ नोटीस पे देऊन सर्व कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले आहे. ई-बालभारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, काही दिवसांत ती सुरू होईल.’’

दूध भेसळप्रकरणी आठ जणांवर खटले  
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील दूध वाहतूक वाहनांची तपासणी केली होती. मोशी, लोणी काळभोर आणि खेड शिवापूर टोल नाक्‍यावर ही मोहीम राबविली. त्यातील २४ नमुन्यांचा तपासणी अहवाल आणि दोषींवरील कारवाईचे काय झाले, असा प्रश्‍न सदस्य अनिल भोसले यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना अन्न व औषधमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘छाप्यांमध्ये घेण्यात आलेले २४ नमुने विश्‍लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी १६ नमुने प्रमाणित दर्जाचे, ८ नमुन्यांमध्ये पोषणमूल्य कमी दर्जाचे असल्याचा अहवाल मिळाला आहे. दोषींविरोधात कारवाई केली आहे.’’

Web Title: maharashtra news balbharti