भीमाशंकर विकास प्रकल्पाला अंतिम मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुमारे 148 कोटी 37 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली. 

पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुमारे 148 कोटी 37 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली. 

पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. तसेच शेकरू, बिबट्या, रानडुक्कर, सांबर आदी प्राण्यांसाठी राखीव असलेल्या वन्यजीव अभयारण्याला देखील लाखो पर्यटक भेट देतात. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर परिसर आणि वन क्षेत्रात पायाभूत सुविधांची मागणी केली जात होती. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून 22 बैठका घेऊन अंतिम आराखडा तयार करण्यात आला. एकूण 148 कोटी 37 लाख रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली. या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावननकुळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, सुरेश गोरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, एमटीडीसीच्या वैशाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, खेड प्रांत आयूष प्रसाद आदी उपस्थित होते. 

लोकोपयोगी कामे होणार 
भीमाशंकर देवस्थान परिसरात चार क्षेत्रांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत. त्यामध्ये पायरीमार्ग, भीमाशंकर मंदिर परिसर, महादेव वन आणि बस स्थानक परिसरात विविध लोकोपयोगी कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, सीसीटीव्ही व माहितीफलक, पोलिस ठाणे, मोबाईल टॉवर यांची उभारणी केली जाणार आहे.

Web Title: maharashtra news Bhimashankar development