आढळरावांना भाजपचे ‘आवतण’

भरत पचंगे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

शिक्रापूर - शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. तसे झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत तेच भाजपचे उमेदवार असतील, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

शिक्रापूर - शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. तसे झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत तेच भाजपचे उमेदवार असतील, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पातळीवर हा विषय सुरू आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक सन २०१९ मध्ये एकत्र घेतली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्या तयारीचा भाग म्हणून, भाजपने इतर पक्षांतील मातब्बर आपल्याकडे येऊ शकतील किंवा कसे, याची चाचपणी सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला अन्य पक्षांतील काही कार्यकर्तेही स्वतः भाजपशी संपर्क साधून महत्त्वाचे पद, उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  

आढळराव पाटील यापूर्वी सलग तीन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्याऐवजी खुद्द त्यांनाच भाजपकडून उभे केल्यास हमखास यश मिळेल, अशी काही भाजप नेत्यांची धारणा आहे. त्या दृष्टीने अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. आमदार महेश लांडगे हेही शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र, आढळराव यांच्यासंदर्भातील विचार सुरू झाल्यावर, लांडगे यांचे या मतदारसंघातील दौरे पक्षानेच ‘नियंत्रित’ केले असल्याचा दावा एका भाजप नेत्याने केला. 

शिरूर- हवेलीतही भाजपचे गळ
शिरूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्‍यात झालेल्या सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर, आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी स्वीकारण्यास तयार आहात काय, अशी विचारणा करण्यात आली आहे. ‘निवडणुकीच्या एक वर्ष आधी वाजतगाजत या, तुमचे गट- संघटना सोबत आणा, पक्षाचे पाठबळ आणि उमेदवारीही देऊ,’ असे आश्वासन भाजपच्या पुण्यातील एका बड्या नेत्याने दिले असल्याचा दावा एका इच्छुकाने ‘सकाळ’शी बोलताना केला. 

अर्थात सध्या उघड कोणी काहीच बोलत नसले, तरी पुढील निवडणुकीसाठी पडद्याआड हालचाली सुरू झाल्या आहेत, हे निश्‍चित.

गडकरींचे आढळरावांना जेवणाचे निमंत्रण
पुण्यात नुकत्याच झालेल्या दोन कार्यक्रमांच्या वेळी फडणवीस आणि गडकरी यांनी भाजप प्रवेशाबाबत आढळरावांशी चर्चा केली. तेव्हा गडकरी यांनी आढळराव यांना दिल्लीच्या घरी जेवणाचे आवतणही (निमंत्रण) दिले, अशी माहिती आढळरावांच्या निकटवर्तीयांनी दिली.

Web Title: maharashtra news bjp Shivajirao Adhalarao Patil